गर्दी लक्षात घेऊन मनपा हद्दीत लसीकरण केंद्र वाढवावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:19+5:302021-04-29T04:15:19+5:30
केडगाव : केंद्र सरकारने दिनांक १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम ...
केडगाव : केंद्र सरकारने दिनांक १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम गतिमान होणार आहे. त्यादृष्टीने नगर शहरात महानगरपालिकेने आपल्या हद्दीत लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज आहे. यासाठी आतापासूनच नियोजन करावे, अशी मागणी नगरसेविका मीना चोपडा यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी आमदार संग्राम जगताप तसेच मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगर शहरात महानगरपालिका व शासनातर्फे कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. जिजामाता रूग्णालय भोसले आखाडा, केडगाव, प्रोफेसर कॉलनी, आयुर्वेद कॉलेज, मुकुंदनगर या परिसरात लसीकरणाची व्यवस्था असून, याठिकाणी आताच ४५ वर्षांपुढील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्र कमी असल्याने अनेकांना बराच वेळ उभे राहूनही लस संपल्यावर घरी परतावे लागते. आता १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरु झाल्यावर या केंद्रांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.