मंत्री एकनाथ शिंदे, दादासोब भुसे यांच्याकडून कोतकर - ठुबे कुटुंबियांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:58 AM2018-04-16T11:58:28+5:302018-04-16T12:01:54+5:30
केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले.
केडगाव : केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले.
केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडात मयत झालेले संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा सोमवारी दशक्रिया विधीचा कार्यक्रम केडगाव येथे झाला़ यावेळी मंत्री एकनाथ शिंदे , राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह जिल्ह्यातील सेना नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे व भुसे यांनी कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कोतकर व ठुबे यांच्या पत्नींनी मंत्र्यासमोर आक्रोश सुरू केला. हत्याकांड करणा-या नराधमांना कडक शिक्षा करा, अशी मागणी त्यांनी केली.
शिंदे म्हणाले, राज्यात कधीच सेनेबाबत अशी दुदैवी घटना घडली नाही. सेनेच्या दोन निष्ठावान कार्यकत्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यांनी कोणी हे हत्याकांड केले असेल त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. शिवसेना एक कुटुंब असून पक्ष कोतकर व ठुबे परिवारासोबत कायम राहिल.
भुसे म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही दुर्घटना गांभीर्याने घेतली असून त्यांच्या आदेशानेच आम्ही येथे आलो आहे. यावेळी अनिल राठोड, आमदार विजय औटी, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, प्रा़ शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिकांची अटक टाळली
केडगाव हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी केडगावमध्ये दगडफेक केली, मृतदेह रुग्णालयात नेऊ दिले नाहीत. त्यामुळे सुमारे ६०० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत. मात्र, अद्याप एकाही शिवसैनिकाला अटक करण्यात आलेली नाही. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आरोपींना अटक होईल, अशी चर्चा होती. दशक्रिया विधीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसासमोरच आरोपी खुलेआम मिरत होते. मात्र, पोलिसांनी एकाही शिवसैनिकाला अटक करण्याची हिंमत दाखविली नाही.