पोलीस भरतीचे सूतोवाच झाल्याने तरुणांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:01+5:302021-01-18T04:19:01+5:30
नगर जिल्ह्यासह राज्यात २०१८ मध्ये पोलीस भरती झाली होती. त्यावेळी जागा कमी होत्या. त्यानंतर तीन वर्षे भरती झाली नाही. ...
नगर जिल्ह्यासह राज्यात २०१८ मध्ये पोलीस भरती झाली होती. त्यावेळी जागा कमी होत्या. त्यानंतर तीन वर्षे भरती झाली नाही. हजारो विद्यार्थी गेल्या चार ते पाच वर्षांपासून भरतीची तयारी करत आहेत. खुल्या प्रवर्गासाठी २८ तर आरक्षित प्रवर्गासाठी ३३ वयोमर्यादा आहे. वयोमर्यादा निघून जात असल्याने भरतीची तयार करणारे अनेक तरुण चिंता व्यक्त करत होता. आता भरती होणार असल्याने तरुणांनी अभ्यास व मैदानाची जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक तरुणांनी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आहे तर ग्रामीण भागातील काही तरुण अभ्यासाठी नगर शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील अभ्यासिका पुन्हा एकदा गजबजल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------
बेरोजगारांना संधी
बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी मिळत नसल्याने बहुतांशी जण कंपन्या व खासगी संस्थांमध्ये नोकरी करत होते. लॉकडाऊनकाळात बहुतांशी जणांची नोकरी गेली. छोटेमोठे व्यवसाय बंद पडले. आता चांगली तयारी करून अनेक जण पोलीस होण्याचे स्वप्न पाहत आहेत.
---------------------------------------------
गृहमंत्र्यांनी पोलीस भरती होणार असल्याचे जाहीर केल्याने अशा पल्लवित झाल्या आहेत. आता शासनाने भरतीची तातडीने तारीख निश्चित करणे गरजेेचे आहे तसेच पेपर ऑनलाइन होणार की, ऑफलाइन हेही निश्चित करावे. मी दोन वर्षंपासून भरतीची तयारी करत आहे. त्यासाठी गावाकडून नगरमध्ये आलो आहे.
- पांडुरंग खेडकर, पाथर्डी
---------------------------------------------------
गेल्या चार वर्षंपासून भरतीची तयारी करत आहे. आता तयारी आणखी वाढविली आहे. यासाठी नेवासा येथून नगर येथे आलो आहे. शहरात राहण्याचा महिन्याचा किमान ५ हजार रुपये खर्च आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. त्यासाठी शासनाने तातडीने जास्तीत जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवावी.
विशाल म्हस्के, नेवासा