रुग्ण घरी परतल्यानंतर कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:14+5:302021-04-13T04:19:14+5:30
अहमदनगर : येथील आगरकर मळा परिसरात ४० ते ४५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यातील काही रुग्ण सात दिवसांनी ...
अहमदनगर : येथील आगरकर मळा परिसरात ४० ते ४५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यातील काही रुग्ण सात दिवसांनी बरे होऊन घरी परतले आहेत. त्यानंंतर शनिवारी आगरकर मळा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या २० नागरिक सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यासाठी दोन हजार लोकांचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.
आगरकर मळा परिसरात दोन हजार लोकवस्ती असलेल्या सागर कॉम्प्लेक्स, अर्बन बँक कॉलनी, झेडपी काॅलनी आदी भागाचा समावेश आहे. हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून सील केला आहे. दरम्यान हा प्रकार म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असाच प्रकार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा भाग सील करताना कुठलाही भौगोलिक रस्त्याच्या रचनेच्या अडचणी येऊ शकतात, याचा अभ्यास करण्यात आला नाही. विशेष म्हणजे कंटेन्मेंट झोनचा आदेश आणि प्रत्यक्ष सील केलेला परिसर याच्यामध्ये बरीच तफावत दिसून आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. राजकारणी लोकांना कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
--------
२० बाधित रुग्णांसाठी दोन हजार लोक राहात असलेला परिसर सील करणे उचित नाही. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना ६० रुपये लिटर दूध आणि महागडा दरात भाजीपाला घ्यावा लागतो. याच झोनमध्ये जे आरोग्य सेवक राहतात त्यांना बाहेर राहण्याची व्यवस्था करायला सांगितले गेले आहे. आरोग्य सेवक आपल्या सर्वांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत. अशा वेळेस त्यांनी परत घरी जायचे नाही हा कसला कायदा आहे? तसेच ३-४ कुटुंबांकडे गाई-म्हशी जनावरे आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
-सुहास मुळे, जागरुक नागरिक मंच
-------------
कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना सहकार्य केले पाहिजे. प्रशासन नियमानुसार काम करीत आहे. सध्याची परिस्थिती आंदोलन करण्याची नाही. तसेच नागरिकांना स्वस्त सेवा पुरविण्याबाबत आपलेही प्रशासनाशी बोलणे झाले आहे. कोरोना उपाययोजना करताना परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. यात कोणताही दुजाभाव केला जात नाही. अन्यथा, रुग्ण वाढण्याचा धोका असतो.
-सुनील काळे, माजी नगरसेवक
------
कोरोना चाचणी अहवाल उशिरा प्राप्त होत असल्याने काही रुग्णांना सात दिवस झाले असावेत. मात्र काही नागरिकांचे अहवाल तीन-चार दिवसांनी प्राप्त झालेले आहेत. कंटेन्मेंट झोन करण्यात आलेल्या आगरकर मळा परिसरात ३०-४० रुग्ण बाधित आहेत. त्यातील काही रुग्ण बरे झालेले आहेत. सध्या २० रुग्ण सक्रिय आहेत. रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागातच कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून, नागरिकांचे आरोप तथ्यहीन आहेत. दूध, भाजीपाला स्वस्त देण्याबाबत कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत.
-प्रदीप पठारे, उपायुक्त, महापालिका
-----------------
असा आहे कंटेन्मेंट झोन
आगरकर मळा, विरंगुळा मैदान चौक ते सागर काॅम्प्लेक्स ते बेल्हेकर यांचे घर ते पश्चिम बाजूस डीपी रोड ते सोना विहार बंगला ते श्री पाटील यांचे घर ते अर्बन बॅंक काॅलनी, आयकाॅन पब्लिक स्कूलसमोरील कोथंबिरे यांचे घर ते विरंगुळा मैदान चौक.