गोदावरीतील दूषित पाण्याचा सर्रास शेतीसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:04+5:302021-03-22T04:19:04+5:30
रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद गोदावरी नदीत शहरातील मैलामिश्रीत तसेच हानिकारक रासायनिक घटक असलेले सांडपाणी ...
रोहित टेके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद गोदावरी नदीत शहरातील मैलामिश्रीत तसेच हानिकारक रासायनिक घटक असलेले सांडपाणी सोडून नदीपात्राचे प्रदूषण करीत आहे. याच प्रदूषित पाण्याचा वापर नदीकाठचे शेतकरी सर्रासपणे शेकडो एकर शेतीसाठी करत आहेत. त्यापासून भाजीपाल्यासह सर्वच प्रकारची पिके तसेच जनावरांच्या चाऱ्याचे उत्पादन घेत आहेत. याच हानिकारक पाण्यापासून उत्पादित विविध पिके बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, ही सर्व पिके माणसासह जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहेत.
कोपरगाव नगरपरिषद शहराचे दररोज निघणारे लाखो लीटर मैलामिश्रीत, हानिकारक घटक असलेले सांडपाणी हे गटारीद्वारे अनेक वर्षांपासून गोदावरी नदीपात्रात सोडत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शहरालगतच्या नदीपात्रात पाणी असते. नदीकाठचे शेतकरी विद्युत मोटारीच्या साह्याने हे पाणी आपल्या शेतात नेऊन पिकांचे उत्पादन घेत आहेत. परंतु, मैलामिश्रीत पाणी नदीपात्रात वाहात येते. त्याबरोबर हानिकारक रासायनिक घटकही वाहून येतात. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदीपात्राच्या भूगर्भाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.
ज्यावेळी हे पाणी शेतातील पिकांना दिले जाते. त्यावेळी हे सर्व हानिकारक घटक पिकांच्या मुळाद्वारे शोषले जातात. या पाण्यातून उत्पादीत झालेला भाजीपाला तसेच धान्यात हे घटक स्थिर होतात. विशेष म्हणजे अशा पद्धतीचा भाजीपाला अथवा धान्य आरोग्यास अपायकारक ठरते. याच पाण्यावर उत्पादीत केलेला चारा जनावरांना खाऊ घातल्यास त्यांनाही त्रास होतोच. परंतु चाऱ्यापासून तयार झालेले दूधदेखील मानवी शरीरासाठी अपायकारक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
..................
सांडपाण्यावर प्रक्रिया नाही
कित्येक वर्षांपासून कोपरगाव नगर परिषद शहराच्या सांडपाण्यावर कोणतीच उपाययोजना न करता हानिकारक रासायनिक घटक असलेले मैलामिश्रीत सांडपाणी नदीत सोडत आहे. हे पाणी हानिकारक असल्याचे माहीत असतानाही शेतीसाठी वापर होत आहे. यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पाणी वापराला कोपरगाव नगर परिषदेचा बेजाबदारपणा कारणीभूत आहे.
...........
कोपरगाव शहरातून नदीत सोडलेल्या पाण्यात अनेक हानिकारक घटक असतात. अशा पाण्याचा शेतात वापर करून पिकांचे उत्पादन घेतल्यास पिकांची मुळे पाण्यातील हानिकारक घटक शोषून घेतात. अशा पद्धतीने उत्पादीत पिके माणसांच्या तसेच जनावरांच्या खाण्यात आली तर ती आरोग्यासाठी अपायकारक ठरतात. त्यातून भीषण आजारही जडतात.
- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव.
..
२१गोदावरी पाणी उपसा
..
ओळ-कोपरगाव शहरातील गोदावरी नदीपात्रातील दूषित पाणी पीक व भाजीपाल्यासाठी वापरले जाते. मोटारी लावून हे पाणी उपसले जाते.