कोरोना काळात एमआयडीसीचे योगदान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:31+5:302021-06-11T04:14:31+5:30
सुपा : कोरोनाच्या दोन्ही टप्प्यात सुपा एमआयडीसीतील कारखान्यांनी आरोग्य विभागाला चांगली मदत केली. त्यांचे योगदान कोरोना काळात महत्त्वाचे ...
सुपा : कोरोनाच्या दोन्ही टप्प्यात सुपा एमआयडीसीतील कारखान्यांनी आरोग्य विभागाला चांगली मदत केली. त्यांचे योगदान कोरोना काळात महत्त्वाचे ठरले. या सुविधांचा रुग्णसेवेसाठी निश्चितच चांगला फायदा होईल, असे असे प्रतिपादन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी केले. कामगारांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबतही सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही सांगळे यांनी यावेळी दिली.
पारनेर तालुक्यातील सुपा येथील आम इंडिया, जाफा कारखान्याने आरोग्य विभागाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. हा कार्यक्रम आम इंडिया कंपनीमध्ये गुरुवारी झाला. यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे, मंडलाधिकारी नंदकुमार साठे यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुपा एमआयडीसीतील इपिटॉम, जाफा, आम इंडिया, अकॉर्ड या कारखान्यांच्या माध्यमातून मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर आरोग्य विभागाला मिळाले होते.
कोरोनाच्या काळात आरोग्य उपकेंद्र व आरोग्य केंद्रात त्याचा रूग्ण तपासणी करताना उपयोग झाल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती गरज पाहता कारखान्यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याची मागणी करताच आम इंडिया, जाफा व कॅरिअर मायडिया या कारखान्यांनी ते उपलब्ध करून दिले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भटू भोई, डॉ. मानसी मानूरकर, आरोग्यसेवक विजय भोईर, आम इंडियाचे प्लॅन्ट मॅनेजर राहुल काळे, एचआर हेड संदीप गोखले, जाफाचे व्यवस्थापक नेमिनाथ सुतार, ज्ञानेश देशपांडे, महादेव साळुंके आदी उपस्थित होते. संदीप गोखले यांनी आभार मानले.
---
१० सुपा एमआयडीसी
सुपा एमआयडीसीतील आम इंडियाच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्याकडे देताना एचआर हेड संदीप गोखले, प्लँट मॅनेजर राहुल काळे. यावेळी डॉ. भागवत दहिफळे, डॉ. मानसी मानूरकर.