आहारावर नियंत्रण महत्त्वाचे-डॉ.गोपाळ बहुरूपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:09 PM2019-11-13T17:09:47+5:302019-11-13T17:11:06+5:30
योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला.
जागतिक मधुमेह नियंत्रण दिन विशेष
अहमदनगर : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. घरामध्ये कोणाला मधुमेह नाही, म्हणजे तो आपल्याला होणार नाही, असे मुळीच नाही. योग्य आहार, व्यायाम आणि योग-प्राणायाम नियमित असेल, तर मधुमेहाला पळवून लावू शकतो. शरीरातील सर्वच अवयवांवर परिणाम करणारा हा आजार आहे. शरीरातील वाढणारी साखर डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत मधुमेहाच्या रुपाने दुष्परिणाम करते. रोज नित्य एक तास चालण्याने मधुमेह बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी व्यक्त केला. जागतिक मधुमेह नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मधुमेहाचा आजार आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला.
मधुमेहाचा आजार कधी होतो?
व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, वार्धक्य, स्वादुुपिंडाचे आजार, थॉयराईडचे आजार आदी कारणांनी हा आजार होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले, की स्वादुपिंडाचे संप्रेरक इन्शुलिन याचे कमी प्रमाणात स्त्रवन झाल्यामुळे शरीरातील, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. उपाशीपोटी ८० ते १०० आणि जेवणानंतर १२०-१८० असे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य असते. मधुमेह तीन टप्प्यांमध्ये होतो.
मधुमेहाची लक्षणे कोणती?
कामात उत्साह न वाटणे, कमी श्रम केल्यानंतरही वारंवार थकवा जाणवणे, लघवीला वारंवार व अतिप्रमाणात होणे, लघवीला विशिष्ट प्रकारचा मधुगंध येणे, तोंडाला वारंवार दोड पाणी, लाळ आल्यासारखे वाटणे, तहान वारंवार लागणे ही व यासारखी मधुमेहाची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात.
मधुमेहाचे नियंत्रण कसे करायचे?
मधुमेह हा पूर्णपणे बरा न होणारा, परंतु औषधोपचार व व्यायामाने नियंत्रित होणारा आजार किंवा व्याधी आहे. औषधौपचाराद्वारे, व्यायामाद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येते. मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी फक्त चार गोष्टींची आवश्यकता आहे. १) आहार नियंत्रण, २) नियमित औषधोपचार, ३) व्यायाम, ४) डॉक्टरांचा सल्ला व तपासणी. एकाचवेळी भरपूर आहार घेण्यापेक्षा थोड्याथोड्या प्रमाणात आहार घ्यावा. चालणे, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, रोज एक तास नियमित चालावे. जेवणानंतर वज्रासनात बसावे. नियमित व्यायामामुळे केवळ मधुमेहावरच नव्हे, तर सर्वच आजारांवर योग्य परिणाम होतो. याशिवाय डॉक्टरांकडून वारंवार तपासणी करून घेणे गरजेचे आहे.