बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 11:02 AM2024-10-26T11:02:38+5:302024-10-26T11:05:42+5:30
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर पुन्हा ठिय्या आंदोलनाला सुरुवात.
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : युवा संकल्प मेळाव्याअंतर्गत शुक्रवारी (दि.२५) रात्री तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल सभेत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री १० वाजता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू झालेले आंदोलन सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर येथेच शनिवारी सकाळी १० वाजता पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांचे समर्थक धांदरफळ बुद्रूक येथील बाजारतळ परिसरात मोठ्या संख्येने जमले होते. यात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. डॉ. विखे-पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण होते. त्या भाषणात त्यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचे आणि अशोभनीय आहे. असेही महिलांनी बोलताना सांगितले.
देशमुख यांना येथे आणा ; महिला आक्रमक
धांदरफळ बुद्रुक येथे ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच व्यासपीठावर आमदार थोरात समर्थक हे रात्री उशिरा एकत्र जमले होते. त्यांनी वसंतराव देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांना येथे आणा, त्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही. असा पवित्रा महिलांनी घेतला होता. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू झाले, हे आंदोलन सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत सुरू होते. पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
वाहन जाळले ; वाहनांची तोडफोड
शहरातील अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे फलक फाडण्यात आले. चिखली येथे एक चारचाकी वाहन जाळण्यात आले. इतरही ठिकाणी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.