संगमनेरमधील कुंभारवाडीत दोन गटात वाद : ९ मोटारसायकल जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:38 PM2019-01-15T12:38:29+5:302019-01-15T12:39:22+5:30
पळून जावून विवाह केलेल्या चुलत बहिणीला जत्रेसाठी बोलविल्याने दोन गटात झालेल्या वादातून नऊ मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.
आश्वी : पळून जावून विवाह केलेल्या चुलत बहिणीला जत्रेसाठी बोलविल्याने दोन गटात झालेल्या वादातून नऊ मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावात सोमवारी घडली. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुंभारवाडी येथे सोमवारी यात्रौत्सव होता. त्यावेळी राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील अरूण वारे हे पत्नीसह या यात्रौत्सवासाठी आले होते. यावेळी त्याच्या पत्नीचा चुलत भाऊ नामदेव काशिनाथ केदार याने वारे याची सासू फुलाबाई यांना मुलगी व जावई या दोघांना यात्रेसाठी का बोलावले? अशी विचारणा करत त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर वारे याने त्याच्या नातेवाईकांना तेथे बोलावून घेतल्यानंतर दोन गटात वाद होवून हाणामारी झाली. यावेळी वारे याचे नातेवाईक घेवून आलेल्या मोटारसायकली तेथेच सोडून पळून गेले. त्यानंतर नामदेव केदार व इतरांनी त्या नऊ मोटारसायकली पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अरूण महादू वारे व नामदेव काशिनाथ केदार या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.