छावणीचालक शरद मरकडची न्यायालयाने केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 03:36 PM2019-02-23T15:36:38+5:302019-02-23T15:36:51+5:30
तालुक्यातील निवडुंगे येथे गेल्या तीन महिन्यांपासून स्वखर्चाने चारा छावणी चालवणा-या शरद मरकड यास न्यायालयाने मुक्तता केली.
पाथर्डी : तालुक्यातील निवडुंगे येथे गेल्या तीन महिन्यांपासून स्वखर्चाने चारा छावणी चालवणा-या शरद मरकड यास न्यायालयाने मुक्तता केली. शरद मरकड याच्यासह देविदास मरकड यांनी शासन छावणी मंजूर करत नसल्याच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना काल सायंकाळी अटक केली होती. मात्र आज न्यायालयाने मरकड याची सुटका केली.
तालुक्यातील निवडुंगे येथे दुष्काळी परिस्थितीत गेली तीन महिन्या पासून स्वखर्चाने चारा छावणी सुरु केली. शरद मरकड व शेतकरी देविदास मरकड यांनी शासनाने चारा छावणी मंजूर न केल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री राम शिंदे यांनी मेल पाठवून तसेच सोशल मिडीयावरून आत्मदहन करण्याच्या क्लिप पाठवून इशारा दिल्या नंतर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शरद मरकड व देविदास मरकड यांना पाथर्डी पोलिसांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता अटक केली होती. शनिवारी सकाळी अकरा वाजता शरद व देविदास यांना न्यायालया समोर उभे केले असता कायदा व्यवस्थेला बाधा येवून जीवितहानी होवू नये म्हणून तसेच इतर व्यक्तीना आत्मदहनास प्रोत्साहन देवू नये म्हणून शरद व देविदास यांना १४ दिवस कोठडीत ठेवण्याची मागणी सहायक पोलिस निरिक्षक परमेश्वर जावळे यांनी केली. त्यास मरकड यांचे वकील हरिहर गर्जे व चंद्रकांत सातपुते यांनी आक्षेप घेतला. गेल्या तीन महिन्यापासून स्वखर्चातून चालवत असलेली छावणी निकषात बसत असतांना मंजूर केली नाही. केवळ सनदशीर मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी राजकीय आकसातूनमरकड यांना अटक केले. मरकड यांना कोठडीत ठेवले तर छावनीतील जनावरे उपाशी राहतील असा युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत जीवितास हानी पोहचवणार नाही अशा वैयक्तिक हमीपत्रावर न्यायाधीश दत्तराज पटवे यांनी शरद व देविदास यांना मुक्त करण्याचा आदेश दिला.