तांबे हॉस्पिटलचा मेडिकव्हर हॉस्पिटलसोबत करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:45+5:302021-04-06T04:19:45+5:30
जगातील १२ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य सुविधा देणाऱ्या मेडिकव्हर या हॉस्पिटलसमवेत तांबे हॉस्पिटलचा सेवा करार झाला. मेडिकव्हर हॉस्पिटलचे (ग्लोबल) मुख्य ...
जगातील १२ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य सुविधा देणाऱ्या मेडिकव्हर या हॉस्पिटलसमवेत तांबे हॉस्पिटलचा सेवा करार झाला. मेडिकव्हर हॉस्पिटलचे (ग्लोबल) मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन स्टूबिंगटन, मेडिकव्हर हॉस्पिटल (भारत) कार्यकारी संचालक हरिकृष्णा, मेडिकव्हर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सचिन बोरसे, वरिष्ठ उपाध्यक्ष नीरज इलाल, तांबे हॉस्पिटलचे संचालक डॉ. हर्षल तांबे आदी उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे यांनी बी.जे. मेडिकल पुणे येथून एम. एस. सर्जनची पदवी घेतल्यानंतर संगमनेर शहरात वैद्यकीय सेवा सुरू केली. १९८४ मध्ये स्वतंत्र तांबे हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे जनसामान्यांना आरोग्यसेवा देताना रुग्णांचे हक्काचे ठिकाण म्हणून तांबे हॉस्पिटलचा लौकिक झाला. पुढे २००९ मध्ये या हॉस्पिटलला आधुनिकतेची जोड देत सुसज्ज, प्रशस्त व आधुनिक सुविधा असलेल्या सुपर स्पेशालिटी तांबे हॉस्पिटलमधून हृदयरोग, शस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, अस्थिरोग, किडनी रोग, अतिदक्षता विभाग, स्वतंत्र अपघात विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, पोटाचे विकार, कर्करोग, नेत्ररोग, बालरोग अशा विविध आजारांवर स्वतंत्र उपचार केले जात आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या गैरसोय टाळण्यासाठी तांबे हॉस्पिटलने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मेडिकव्हर या हॉस्पिटलबरोबर करार केला आहे. यामुळे नागरिकांची अतिदक्षता रुग्णांच्या उपचारासाठी होणारी धावपळ थांबणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये सर्व मेडिक्लेम, इन्शुरन्स व महात्मा फुले जीवनदायी योजनेसह सर्व शासकीय योजनाही तातडीने लागू होणार आहेत. या नव्या करारामुळे संगमनेर, उत्तर अहमदनगर जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत उच्च व गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा तातडीने या ठिकाणी मिळणार आहेत. (वा.प्र.)