कर्डिले यांचे आरोप बिनबुडाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:23+5:302021-04-12T04:18:23+5:30
तनपुरे म्हणाले, तनपुरे कुटुंबीयांचे राजकारण जिल्ह्याला सर्वश्रुत आहेत. कधी कोणाला साधी चापटही आम्ही मारली नाही. त्यामुळे कोणाचा जीव घेणे ...
तनपुरे म्हणाले, तनपुरे कुटुंबीयांचे राजकारण जिल्ह्याला सर्वश्रुत आहेत. कधी कोणाला साधी चापटही आम्ही मारली नाही. त्यामुळे कोणाचा जीव घेणे ही आमच्यासाठी लांबची गोष्ट आहे. उलट ज्यांचे राजकारण हे गुन्हेगारीतून पुढे आले. त्यांनीच आमच्यावर खोटे आरोप करणे हा बालिशपणा आहे. सर्वांचा सन्मान करणे हेच संस्कार आहेत. कर्डिले हे आरोप करून राजकारण करीत आहेत. त्यांनी डॉ. तनपुरे शिक्षण संस्थेच्या जमिनी खरेदी प्रकरणाचा उल्लेख केला. १९९२ साली संस्थेची जमीन खरेदी झाली. त्या व्यवहाराचे सर्व कागदपत्रे व खरेदीखत उपलब्ध आहे. याबाबत दातीर यांची कोणतीही तक्रार नव्हती. कर्डिले यांनी माझा मुलगा सोहम याचे नाव घेऊन आरोप केले. त्याच्या नावावर कोणतीही जमीन खरेदी नाही. माझे मेहूणे यांनी त्याच्या नावावर प्रॉपर्टी घेतली असेल; परंतु त्या प्रॉपर्टीबद्दल दातीर यांचा कोणताही वाद नव्हता. त्या जागेबाबत पूर्वी दातीर व पठारे यांच्यात न्यायालयीन लढा सुरू होता. परंतु दातीर यांनी मार्च २०२० मध्येच त्या प्रॉपर्टीबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत.
पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आमची सत्ता आहे. आमच्याकडून संबंधित पालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर विकासकामे होण्यासाठी अनेकदा ठराव मांडलेले आहेत. त्याचे लेखी पुरावेही पालिकेत उपलब्ध आहेत. याबाबत कर्डिले यांना कोणतीही माहिती नसावी. त्यांनी पालिकेतील आपल्या नगरसेवकांकडून सत्य माहिती घ्यावी. दातीर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून पोलीस प्रशासन तपास काम करीत आहेत. ते नक्कीच घटनेचे सर्व काही सत्य जनतेपुढे आणतील.