कोराेनायोद्धा तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:25+5:302021-05-13T04:20:25+5:30
देवदैठण : कोरोना झाला म्हटले तरी पोटात भीतीने गोळा येतो व कोरोनाबाधिताचा संपर्क आल्यावर तर अनेकांचा थरकाप उडतो. अशा ...
देवदैठण : कोरोना झाला म्हटले तरी पोटात भीतीने गोळा येतो व कोरोनाबाधिताचा संपर्क आल्यावर तर अनेकांचा थरकाप उडतो. अशा कोरोना संकट काळात मात्र देवदैठणमधील (ता.श्रीगोंदा) तरुणांनी कोरोनायोद्ध्यांची भूमिका पार पाडताना रुग्णसेवेचा वसा घेतला आहे.
देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे या दांपत्याने डॉ. पद्मभूषण अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिर उभे करून परिसरातील कोरोनाबाधितांना उपचार व आधार देण्याचे काम केले आहे.
येथे अनेक कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांची सेवा सुश्रूषा करण्याचे मोलाचे कार्य उद्योजक अतुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी हाती घेतले आहे. या सेंटरमध्ये प्रतीक वाघमारे, अजित वाघमारे, सूरज मुळे, सचिन माने, संदीप बोरगे, सुयोग गायकवाड हे तरुण अहोरात्र येथील रुग्णांची काळजी घेतात. रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कार्य करत आहेत. आरोग्यदूताची भूमिका ते प्रामाणिकपणे निभावत आहेत.
नास्ता, जेवण स्वतः रूममध्ये घेऊन जातात. गोळ्या, औषधे घेतली का, काही त्रास होतोय का? याची आपुलकीने चौकशी करतात. ऑक्सिजन पातळी तपासणे, प्रत्येकाला वाफ घेण्याची आठवण करून देतात. पाण्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या गोष्टी लक्षपूर्वक करतात.
काय हवं, काय नको या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतात. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची विचारपूस करून काळजी घेतात.
या तरुणांना साहाय्य करणारे दीपक वाघमारे, किशोर गायकवाड, बाळासाहेब कौठाळे, प्रतीक वेताळ, प्रमोद उबाळे, इक्बाल शेख, शिवाजी वाघमारे, मनेश गव्हाणे, तेजस बोरगे, मनेश निघुल, आकाश उदमले, सागर यादव, सतीश वाघमारे, सागर वाघमारे हे तरुणदेखील सेवा देत आहेत.
---
आम्ही मित्र या आरोग्य मंदिरात सेवा देत असल्यामुळे मनस्वी आनंद होतोय. अशा रुग्णांना मानसिक आधाराची खूप गरज असते तो आधार आम्ही देतोय. आता सध्या माणसात अंतर ठेवा माणुसकीत नको.
-प्रतीक वाघमारे,
कोरोनायोद्धा, देवदैठण
---
या कार्यास अनेकांनी मदत केली आहे. हे सर्व तरुण स्वेच्छेने आरोग्य मंदिरात रुग्णसेवा करत आहेत. या तरुणांच्या सहकार्यामुळेच कोविड सेंटर सुरू करता आले. कोरोना संकटाच्या काळात तरुणांचे काम कौतुकास पात्र आहे. या सर्वांना रुग्णांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे.
- कल्याणी लोखंडे,
पंचायत समिती सदस्या, श्रीगोंदा
---
१२ प्रतीक वाघमारे, अजित वाघमारे, सूरज मुळे, संदीप बोरगे, सचिन माने, सुयाेग गायकवाड