कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:16+5:302021-06-17T04:15:16+5:30

कोरोनाचे संकट आले. कोरोना होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेतात. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांनी त्यांच्या आहारात बदल केला. कोरोनाने ...

Corona after-home kitchen; Healthy foods increased | कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

कोरोनानंतर बदलले घराघरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले

कोरोनाचे संकट आले. कोरोना होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेतात. कोरोनातून बरे झालेल्या अनेकांनी त्यांच्या आहारात बदल केला. कोरोनाने नागरिकांची जीवनशैली बदलली.

सकाळीच नाष्ट्याची सवय झाली. दुपारचे, रात्रीचे जेवण वेळेवर घेण्यास सुरुवात केली. काही शाकाहाराकडून मांसाहाराकडे, तर काही मांसाहारकडून शाकाहाराकडे वळले. आहार कोणताही का असेना आरोग्य जपत फिट राहायला प्राधान्य दिले जाते आहे.

आहारात कडधान्य, पालेभाज्या, मांसाहार, अंडी, दूध, दुधापासून बनविले पदार्थ त्याचबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाचा समावेश करीत असल्याचे महिलांनी सांगितले. पूर्वी पालेभाज्या, डाळींच्या भाज्या मुले खात नव्हते. मात्र, डाळ्यांची भाजणी करीत पालेभाज्या-भाजणी एकत्र करून थालीपीठ बनवून दिल्याने मुले ते आवडीने खातात. या अगोदर कुठले तरी एकाच प्रकारचे खाद्यतेल घरी आणले जायचे. मात्र, आता सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, करडई असे विविध प्रकारचे खाद्यतेल स्वयंपाक घरात वापरले जाते आहे.

जास्त तेला, तुपातील पदार्थ खाण्याचे टाळत आहेत. पावभाजी, मिसळ बनविल्यानंतर पावाऐवजी त्यासोबत गरमागरम चपाती खाण्याची मुलांना सवय लावली आहे. फळांचादेखील आहारात समावेश केला आहे. पोळी, भाकरी खायचा कंटाळा मुलांनी केल्यास त्यांना गहू, बाजरी व तांदळाच्या पिठाची गोड, तिखट पेज बनवून दिल्याने मुले आता घरचे पौष्टिक अन्न चवीने खात आहेत.

----------------------

हे पूर्णपणे टाळले

उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणे पूर्णपणे टाळले. मुले अनेकदा कोल्ड्रिंक, आइस्क्रीम मागायचे. मात्र, सर्दी, खोकला, कफ होऊ नये म्हणून ते त्यांना दिले नाही. त्याऐवजी लिंबू सरबत, चिंच, कैरीचे पन्हे मुलांना द्यायचो. मैदा तसेच तेलकट, तुपकट पदार्थांचा आहारात समावेश कमी केल्याचे महिलांनी सांगितले.

--------------

मोड आलेले कडधान्य

मटकी, हरबरा, मूग, वटाणे ही मोड आलेली कडधान्ये खायला प्राधान्य दिले जात आहे. मुलांना अंडी, फळे दररोज देण्यात येतात. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.

--------------

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणावमुक्त जीवन व योग्य आहार या चार गोष्टी गरजेच्या आहेत. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे पायी चालावे. ७ ते ८ तास झोप हवीच. तणावमुक्त आणि सकस आहार घेणे महत्त्वाचे ठरते. वरील चार गोष्टी अमलात आणल्यास आजारांना आपण टाळू शकतो. प्रत्येकाच्या वय, वजन यानुसार त्याने आहार घेणे गरजेचा आहे. सर्व प्रकारची फळे घ्यावीत. मधुमेह असलेल्यांनी फळांचा रस घेऊ नये.

- हर्षदा तांबे, न्यूटरीशिअनिस्ट, घाटकोपर पूर्व, मुंबई

------------

पालेभाज्या, डाळींपासून बनविलेल्या भाज्यांना मुले तोंड लावत नाहीत. त्यामुळे डाळींची भाजणी केली. त्यात पालेभाज्या एकत्र करून थालीपीठ बनविले. घरीच बनविलेल्या तूप, बटरबरोबरच मुले थालीपीठ आवडीने खातात. अधिकाधिक पौष्टिक पदार्थ मुलांना कसे देता येईल, यासाठी प्रयत्न असतो.

- चैताली कुलथे, गृहिणी, संगमनेर

-------------

कोरोनामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळत आहोत. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ घरीच बनवत असून, त्यातही सकस व पौष्टिक आहार मुलांना देण्याचा प्रयत्न असतो. दुधापासून बरेच पदार्थ घरीच बनवितो. मुलांनाही ते खायला आवडतात.

- ज्योती थोरात, गृहिणी, शिक्षिका, रा. संगमनेर खुर्द

--------------

Web Title: Corona after-home kitchen; Healthy foods increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.