कोरोनामुळे तापमापकही ‘लॉकडाऊन’; तापमानाची होईना नोंद : पारा ४० अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 11:24 AM2020-05-10T11:24:26+5:302020-05-10T11:25:12+5:30
पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्या तापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे सांगण्यात येते.
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये वैशाखाचे ऊन चांगलेच तापले आहे. तापमानाचा पारा ४० अंशावर सरकला आहे. पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्यातापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे सांगण्यात येते.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आधीच त्रस्त झालेले आता उन्हाच्या कडाक्याने चांगलेच हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी व सूर्यास्तानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे दुपारी रस्त्यांवरील गर्दी ओसरलेली आहे. दुपारी उन्हाचा कडाका असह्य होत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रेतेही सकाळी दहा ते अकरापर्यंतच रस्त्यावर बसलेले असतात. बँक, हॉस्पिटल, किराणा दुकानातील कामेही नागरिक दुपारच्या आतच उरकून घेत आहेत.
पुणे येथील वेधशाळेच्या आयएमडी या संकेतस्थळावर दैनंदिन अहवालामध्ये अहमदनगर येथील तापमानाची नोंद होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अधिकृत तापमानाची माहिती मिळत नाही़ मात्र, इतर संकेतस्थळांवर स्वयंचलित तापमापकांच्या आधारे घेतलेले तापमान ४० वर गेल्याचे दिसते. मात्र, अहमदनगर कॉलेजच्या भूगोल विभागातील तापमापकावरील नोंद अधिकृत नोंद म्हणून ग्राह्य धरली जाते. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे तापमापकावरील नोंद घेतली जात नाही. त्यामुळे पुणे वेधशाळेकडेही तापमानाची नोंद होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गतवर्षी मे महिन्यात ४२ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान होते. यंदा गतवर्षीपेक्षा तापमान कमी आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे उन्हाचा त्रास कमी जाणवत असण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज सध्या बंद असल्याने दैनंदिन नोंद घेण्यात अडचणी आहेत.
-प्रा. एम. जी. उंडे, भूगोल विभागप्रमुख, अहमदनगर कॉलेज
२४ फेब्रुवारीला ‘लोकमत’मधून वर्तविलेल्या भाकिताप्रमाणे सध्या घडत आहे. यंदा लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने इंधनाचे ज्वलन कमी झालेले आहे. यंदा हिरवागार परिसर जास्त आहे़ वाळलेल्या गवतावरुन सूर्यप्रकाश जास्त परावर्तित होतो़ परिणामी यंदा तापमान ४० अंशाच्या खालीच आहे. चार-पाच दिवसात पूर्वमोसमी पाऊस होईल व तापमान आणखी कमी होईल.
-प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ.