श्रीरामपुरात ५०० रुग्णांचे कोरोना केंद्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:27+5:302021-04-13T04:19:27+5:30
श्रीरामपूर : तालुक्यामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५०० खाटांचे सरकारी अद्ययावत कोरोना उपचार केंद्र सुरू केल्याची माहिती आमदार ...
श्रीरामपूर : तालुक्यामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५०० खाटांचे सरकारी अद्ययावत कोरोना उपचार केंद्र सुरू केल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
शिरसगाव हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह (शंभर खाटा), आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह (चारशे) येथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आमदार कानडे यांनी पत्रकात म्हटले आहे. आमदार निधीतून ३० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी देऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० खाटांचे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले. त्यामुळे त्यांच्या खिशाला झळ पोहोचू दिली नाही.
वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. काही पदे रिक्त असतानाही प्रभारी अधिकाऱ्यांशी संवाद ठेवला. साथरोग नियंत्रणाचा ताण वाढलेला असल्याने संवादाची भूमिका ठेवली. प्रशासनाला सतत प्रोत्साहन व धीर दिला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले, असे कानडे यांनी म्हटले आहे.
रविवारअखेर आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये ५७ रुग्ण दाखल झाले. प्रांताधिकारी अनिल पवार आणि तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी चर्चा करून येथे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. रुग्णांना स्वच्छ पाण्यासाठी फिल्टरची सुविधा केली. नास्ता व चहा तसेच दोन वेळच्या सकस आहाराची व्यवस्था केली. कोरोना केंद्राच्या तीनही इमारती शासकीय असून, नव्यानेच बांधण्यात आलेल्या आहेत. शेजारी ग्रामीण रुग्णालय असल्याने अधिकचे उपचार रुग्णांना मिळत आहेत. त्यामुळे संशयितांनी घरी उपचार घेऊ नये व या केंद्रात दाखल व्हावे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व यंत्रणेने एकदिलाने काम करायचे आहे, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले आहे.