कोरोनाची बिमारी... शिक्षक शाळेत, विद्यार्थी घरी; गजबजलेल्या शाळा सुन्यासुन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:11 PM2020-03-18T13:11:09+5:302020-03-18T13:12:19+5:30
अशी ही ‘कोरोना’ची बिमारी.... शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी’ असा हा विद्यार्थीविना शाळेचा पहिला दिवस शिक्षकांना अक्षरश: सुना सुना गेला.
धामणगांव आवारी : अशी ही ‘कोरोना’ची बिमारी.... शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी’ असा हा विद्यार्थीविना शाळेचा पहिला दिवस शिक्षकांना अक्षरश: सुना सुना गेला.
एरव्ही विद्यार्थ्यांची सारखी किलबिल ऐकू येणा-या आणि गजबजून जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज सर्वत्र निरस वाटत होत्या. ‘कोरोना’ च्या निमित्ताने विद्यार्थीविना शाळेची प्रचिती बहुदा शिक्षकांनी प्रथमच घेतली. ‘कोरोना’मुळे प्रशासकीय स्तरावर सोमवारपासून शाळांतील विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांना कोरोनापासून बचाव आणि काळजी घेण्याबाबत शिक्षकांनी आवश्यक ते मार्गदर्शन करून सुट्टी दिली. मात्र शिक्षकांनी या सुट्टीच्या काळात शाळेत नियमित हजर रहावे, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. शिक्षक बुधवारी सकाळी शाळेत आले खरे, मात्र विद्यार्थीविना त्यांचा दिवस अगदी सुनासुना गेला. या सुट्टीच्या काळात प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे केल्याप्रमाणे कामांची प्राप्त यादीही शिक्षकांनी चाळूनही पाहिली. मात्र शिक्षकांचे मन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळेत रमलेच नाही.