कोरोनामुळे शेती मशागतीच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:29+5:302021-05-24T04:20:29+5:30

श्रीगोंदा : कोरोनाची लाट श्रीगोंदा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन थडकली आहे. कृषीशी निगडित सर्व दुकाने बंद आहेत. अनेक शेतमजूर ...

Corona disrupts farming activities | कोरोनामुळे शेती मशागतीच्या कामांना ब्रेक

कोरोनामुळे शेती मशागतीच्या कामांना ब्रेक

श्रीगोंदा : कोरोनाची लाट श्रीगोंदा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन थडकली आहे. कृषीशी निगडित सर्व दुकाने बंद आहेत. अनेक शेतमजूर कोरोनाशी सामना करीत आहेत. परप्रांतीय शेतमजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. याचे अनिष्ट परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

घोड, कुकडी कालवे आणि भीमा नदीवरील उचल पाण्यामुळे श्रीगोंद्यातील ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तालुक्यातील ७५ हजार शेतकरी कुटुंबे, २० हजार शेतमजूर कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत.

उन्हाळी हंगामात शेतीची मशागतीची कामे सुरू असतात. शेणखत टाकणे, फळबागांची कामे मोठ्या प्रमाणावर चालू असतात. त्यामुळे मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो.

कोरोना लाॅकडाऊनमध्ये एक महिन्यापासून बाजारपेठ बंद आहे. दुसऱ्या लाटेत सात हजार नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी आहे.

कोरोनाचे रुग्ण वाड्या-वस्त्यांवर आहेत. याचा परिणाम शेतीतील मशागत व पीक कापणीवर परिणाम झाला आहे.

कोरोनामुळे साखर कारखाने लवकर बंद झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा ऊस शेतात पडून आहे. हा ऊस गुऱ्हाळाला घालण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. त्यामुळे फळबागा, भाजीपाला पिकावर औषध फवारणी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. फळबागांची तीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत कुकडीचे आवर्तन लांबले. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतकरी अडचणीच्या कात्रीत सापडले आहेत.

---

कुकडीचे आवर्तन लांबले. शेतातील पिके जळून चालली आहेत. कोरोनामुळे मार्केट बंद आहे. पिकांना बाजारभाव नाही, हे विदारक चित्र डोळ्यांतून पाणी आणणारे आहे.

-प्रशांत दरेकर,

हिरडगाव,

---

एक महिन्यापासून कृषी सेवा केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक औषधे खराब होणार आहेत. तसेच उन्हाळी हंगामासाठी खरेदी केलेले बियाणे, औषधे, खते दुकानात पडून आहेत. त्याचे काय करावे असा प्रश्‍न आहे.

- मनीषा खामकर,

जिल्हा उपाध्यक्ष, पेस्ट्रीसाईडस व फर्टिलायझर असोसिएशन

Web Title: Corona disrupts farming activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.