अकोलेतील ठाकरवाड्यांत कोरोनाला ‘साखळदंड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:20 AM2021-05-14T04:20:25+5:302021-05-14T04:20:25+5:30

कोतूळ : गेल्या दोन महिन्यांपासून जगभर कोरोना रुग्णांचे आकडे मोठ्या संख्येने वाढत असताना ठाकरवाड्यांत कोरोना रुग्ण बोटावर मोजण्याइतकेच ...

Corona gets 'chain' in Thakarwada in Akole | अकोलेतील ठाकरवाड्यांत कोरोनाला ‘साखळदंड’

अकोलेतील ठाकरवाड्यांत कोरोनाला ‘साखळदंड’

कोतूळ : गेल्या दोन महिन्यांपासून जगभर कोरोना रुग्णांचे आकडे मोठ्या संख्येने वाढत असताना ठाकरवाड्यांत कोरोना रुग्ण बोटावर मोजण्याइतकेच निघाले. कोरोना मृत्यू झाल्याचे ऐकीवातही नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाकर समाजातील अंद्धश्रद्धा आणि कोरोना लसीबाबत गैरसमज पसरत असताना ठाकरवाड्यांत कोरोना रुग्ण बोटावर मोजण्याइतके सापडले आहेत. अकोले तालुक्यातील ५० हजार लोकसंखेत २ महिन्यांत फक्त ३० रुग्ण आढळले. ‘लोकमत’ने अकोले तालुक्यातील ३० ठाकरवाड्यांतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला असता हे सत्य समोर आले.

अकोले तालुक्यातील घाटघर ते संगमनेर हद्दीवरील पठारापर्यंत लहान- मोठ्या ५० ते ६० ठाकरवाड्या आहेत. १०० ते ८०० लोकसंख्या. गावाबाहेर माळावर एकमेकांपासून दूर अंतरावर छोटी घरे बांधून हे लोक राहतात. दिवसभर जंगलात शिकार, मोलमजुरी, शेळ्या मेंढ्या चारणे हा व्यवसाय. लहान मुले व वृद्ध नदीवर खेकडे, मासे विविध रानभाज्या, फळे, शोधण्यात गर्क, तोच त्यांचा चौरस आहार असतो.

दिवसभर उन्हात मिळेल तिथले ओढ्या, कपारीचे पाणी पितात. तरीही त्यांना कोरोना का बाधू शकला नाही? अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील शेंडी, भंडारदरा, घाटघर परिसरात ७ ते ८ हजार ठाकर समाज ५ ते ६ गावात आहे. येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अकोले तालुक्यात दररोज दीडशेपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. उडदावणे, पांजरे, घाटघर, शिंगणवाडी, साम्रद या गावांमध्ये केवळ एकच रुग्ण आढळला. तोही सौम्य. अकोले तालुक्यातील पन्नास हजारांच्या घरात असलेल्या ठाकरवाड्यांत गेल्या ६० दिवसांत केवळ ३० रुग्ण आढळले.

......

ठाकरवाड्यांतील साठ दिवसांतील कोरोना रुग्ण.

शेंडी (भंडारदरा) - १, पांजरे - ०, घाटघर- ०, शिंगणवाडी- ०, साम्रद - ०, धारवाडी -०, मोरदरवाडी - ०, फणसवाडी- ०, देवाचीवाडी - २

बिबदरवाडी -४ अशी रुग्णसंख्या आहे. धामणगावपाट, लहीत, लिंगदेव, पांगरी, शिदवड, मोग्रस, पिसेवाडी, चास, पिंपळदरी, पाडाळणे, पिंपळगाव खांड या मोठ्या ठाकरवाड्यांत केवळ १३ रुग्ण. दिगंबर, विठे, धामगाव आवारी, अंबड, कळस, बहिरवाडी आदी भागातील आकडेवारी उपलब्ध नाही? मात्र प्रमाण नगण्य आहे. यात विठे घाटातील वाडीत अद्याप एकही रुग्ण नाही.

.................

ठाकर समाज दिवस उगवण्याआधी घराबाहेर पडतो. दिवस मावळतीला घरी येतात. त्यामुळे सकाळचे कोवळे व दुपारचे ऊन अंगावर पडत असल्याने ब जीवनसत्व भरपूर मिळतात. शिवाय मासे, खेकडे व कंदमुळे, रानभाज्यांतून प्रथिने जास्त मिळतात. शारीरिक कष्ट जास्त असल्याने प्रतिकारशक्ती जास्त असते. नेमके हेच घटक कोरोनाचा प्रतिकार करतात. अकोले तालुक्यातील ठाकर समाजात कोरोना रुग्ण अत्यंत कमी, मृत्यू शून्य आहे. विठे येथील ठाकरवाडीत अद्याप वर्षात एकही रुग्ण नाही.

- इंद्रजित गंभिरे, तालुका आरोग्य अधिकारी

.............

ठाकर समाज दूर माळावर राहतो. नेहमी वनसंपदेवर जगतो. स्वच्छता व वनोपजेवर गुजराण करत असल्याने आधुनिक पद्धतीचे अन्न घेत नाही. आमच्या समाजात साथरोग काळात काही विशिष्ट वनस्पती व कंद सेवन करतात.

-मदन पथवे, ठाकर समाजातील सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Corona gets 'chain' in Thakarwada in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.