तालुकास्तरावर कोरोना मदत केंद्र स्थापन करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:41+5:302021-04-17T04:19:41+5:30
संगमनेर : नागरिकांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यास विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाला सहाय्य होईल आणि ...
संगमनेर : नागरिकांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यास विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाला सहाय्य होईल आणि नागरिकांना थेट मदत होईल, अशा पद्धतीने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर कोरोना मदत केंद्र स्थापन करावे, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गुरुवारी (दि.१६) झालेल्या ऑनलाईन बैठकीत डॉ. तांबे बोलत होते. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, मधुकर नवले, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, बाबा ओहोळ, हिरालाल पगडाल, प्रवीण घुले, किरण पाटील, अरुण नाईक, बाळासाहेब आढाव आदी बैठकीवेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मदत केंद्र स्थापन करण्याचा कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी हाती घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील याची अंमलबजावणी पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विशेषतः रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्याकरिता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे पाठपुरावा करीत आहेत, असेही डॉ.तांबे म्हणाले.
------------
श्रीरामपुरात ५० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय
श्रीरामपूरमध्ये ५०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त ५० ऑक्सिजन बेडची क्षमता असलेले रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यास कुणालाही अडचण होऊ नये म्हणून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते काम करतील. असे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले.
श्रीगोंदा तालुका आणि परिसरातील जनतेसाठी २५० बेडचे कोविड केअर सेंटर उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे राजेंद्र नागवडे म्हणाले.