साईनगरीत कोरोनाचा शिरकाव : शिर्डी चौदा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 07:23 PM2020-05-30T19:23:30+5:302020-05-30T19:23:36+5:30
कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
शिर्डी : कोरोनाने शिर्डीत शिरकाव केला आहे़ निमगाव येथील कोरोनाबाधित भाजी विक्रेत्या महिलेच्या शिर्डीतील नातेवाईक महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.
शिर्डी व निमगावमधील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या सातवर पोहचली आहे. या महिलेच्या संपर्कातील २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका भाजी विक्रेती महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या महिलेने शिर्डीतील संस्थान रूग्णालयात उपचार घेतले होते. शिर्डीतील एका नातेवाईकाच्या घरीही तिचे वास्तव्य होते. या महिलेच्या निमगावातील कुटूंबासह सर्वांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेच्या कुटूंबातील अन्य पाचजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. या महिलेची सून लहान मुलीसह शिर्डीतील नातेवाईकाकडे दोन ते तीन दिवसांपासून राहात होती. शुक्रवारी सुनेचा अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र लहान मुलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने चिंता वाढली होती. त्यानंतर आज शिर्डीतील महिलेचा अहवालही पॉझिटीव्ह आला.
प्रांताधिकारी गोंविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमने सायंकाळी तातडीची बैठक आयोजित केली आहे.
पुढील चौदा दिवस या महिलेच्या घराचा परिसर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात येणार आहे. याठिकाणी सर्व व्यवहार व नागरीकांचा वावर बंद राहील. या बाजुचा परिसर बफर झोन असेल. या भागात झोन जाहीर करण्यात येणार आहे. या बफर झोनमध्येही चौदा दिवस ठराविक वेळत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे असे मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी सांगितले.