कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

By चंद्रकांत शेळके | Published: April 6, 2023 03:36 PM2023-04-06T15:36:17+5:302023-04-06T15:37:30+5:30

दोन महिन्यांपासून हळूहळू राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे.

corona is on the head but the health system is fully prepared in nagar | कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

कोरोनाचे डोके वर, आरोग्य यंत्रणा मात्र पूर्ण तयारीत

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : दोन महिन्यांपासून हळूहळू राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. दररोज दीडशेहून अधिक रूग्ण राज्यात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत रूग्ण वाढले तर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात सध्या साडेतीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह रूग्ण आहेत. देशातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र तसेच राज्याच्या आरोग्य विभागाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने व्हीसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संजय घोगरे, तसेच ग्रामीण रूग्णालयांचे अधीक्षक उपस्थित होते. कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांवर भर द्यावा. रूग्णसंख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावेत. शासकीयसह खासगी रूग्णालयांनी सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

ॲाक्सिजन पुरवठा ठेवा 

संशयित रूग्णांच्या जास्तीत जास्त ॲन्टीजेन चाचणी करा. जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रूग्णालयांमधील कोरोना बेड सुसज्ज ठेवा, शासकीयसह खासगी रूग्णालयांमध्येही ॲाक्सिजन सिलेंडर उपलब्ध करा. गर्दीच्या व बंद खोल्यांत मास्क वापरा. आजारी वाटत असल्यास किंवा श्वसनाच्या आजाराची लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी न फिरता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्याची कोरोना स्थिती

आतापर्यंतचे एकूण रूग्ण - ३ लाख ९८ हजार ६३७
गेल्या दहा दिवसांतील रूग्णसंख्या - ५६
एकूण तपासण्या - ४५ लाख ३५ हजार ३९
बरे झालेले रूग्ण - ३ लाख ९१ हजार ३५९
बरे होण्याचे प्रमाण - ९८ टक्के 
एकूण मयत - ७ हजार २३४

लसीकरण आढावा

पहिला डोस - ३४ लाख २० हजार ७७२ (८५.५८ टक्के)
दुसरा डोस - २७ लाख १७ हजार ८५० (६८ टक्के)
बूस्टर डोस - २ लाख ५० हजार ८९ (३६.८४ टक्के)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: corona is on the head but the health system is fully prepared in nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.