पाच महिन्यात तीन जिल्हा परिषद सदस्य कोरोनाने हिरावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:07+5:302021-04-13T04:20:07+5:30
जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, सदाशिव पाचपुते आणि कांतिलाल घोडके यांचे गेल्या पाच महिन्यांमध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे जिल्हा ...
जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, सदाशिव पाचपुते आणि कांतिलाल घोडके यांचे गेल्या पाच महिन्यांमध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहाचे तीन सदस्य कमी झाले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे (वय ४१) यांचे ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबर २०२० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. प्रारंभी त्यांना कोरोनाने ग्रासले. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते होते.
त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२१ रोजी काष्टी (ता. श्रीगोंदा) जिल्हा परिषद गटाचे सदस्य, साईकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव पाचपुते (वय ६६) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावरही पुणे येथे उपचार सुरू होते.
त्यानंतर काल (दि. १२) भाजपचे राशीन (ता. कर्जत) गटाचे जिल्हा परिषद सदस्य कांतिलाल घोडके (वय ५५) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावरही पुणे येथे उपचार सुरू होते.
गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तीन जिल्हा परिषद सदस्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. या शिवाय जिल्हा परिषदेचे काही अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यांचा अंत झाला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या इतर सदस्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
सध्याची स्थिती अतिशय हतबल करण्यासारखी आहे. अनिल कराळे, सदाअण्णा पाचपुते, कांतिलाल घोडके असे आमचे सहकारी एकापाठोपाठ गेले. हा अतिशय वेदनादायी क्षण आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शिवसेना
--------------
अनिल कराळे, कांतिलालजी, तसेच सदाअण्णा यांचे निधन झाल्याने जिल्हा परिषद सभागृहातील खंदे सहकारी हरपले. कोरोनाचा हा काळ भयावह आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्यांचा आणि इतर कर्मचाऱ्यांचा विमा उतरवणे गरजेचे आहे.
- राजेश परजणे, जि. प. सदस्य