श्रीरामपुरात कोरोनाचा मृत्यूदर दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:05+5:302021-03-25T04:20:05+5:30
मंगळवारी येथील प्रशासकीय इमारतीत आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ...
मंगळवारी येथील प्रशासकीय इमारतीत आयोजित कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प.चे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पालिकेचे सीईओ गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, निरीक्षक मधुकर साळवे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. योगेश बंड, आगारप्रमुख राकेश शिवदे, डॉ. सचिन पऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी तहसीलदार पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती दिली.
डॉ.भोसले म्हणाले, काळजी घेतली नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी. थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्या. संशयित जर प्रतिसाद देत नसतील त्यांना उचलून आणून चाचण्या घ्याव्यात.
आरोग्य विभाग, महसूल, पोलीस,नगरपालिका, पंचायत समिती आदी विभागांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.
सीईओ क्षीरसागर यांनी लग्नासाठी ५० लोकांची अट असल्याने लोक आता कार्यालयाऐवजी वाड्या, वस्त्यांवर हजारोंच्या संख्येत लग्न करीत असल्याचे सांगितले. गावोगाव समित्या कार्यरत करून अशा कार्यक्रमांवर पोलीस व स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी समक्ष जाऊन गुन्हे दाखल करावेत, असे आदेश त्यांनी दिले.
-----------
श्रीरामपूर तालुका नापास
प्रशासकीय यंत्रणेमध्ये योग्य समन्वय नसल्याने कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीत तालुका नापास झाल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला. कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
----------
रस्त्यावर उतरून कारवाई
प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रस्त्यावर उतरून कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले.
------