कोरोना प्रादूर्भाव : राहाता तालुक्यातील २५ जणांची तपासणी; तबलीक जमातीच्या आले होते संपर्कात; पाच गावात केले लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:03 AM2020-04-04T10:03:24+5:302020-04-04T10:05:00+5:30
इंडोनेशिया येथील तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्यास आसलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह निघाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या राहाता तालुक्यातील पाच गावातील २५ जणांना खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्री कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.
लोणी : इंडोनेशिया येथील तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्यास आसलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह निघाली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या राहाता तालुक्यातील पाच गावातील २५ जणांना खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्री कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनूसार खबरदारी म्हणून या २५ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार इंडोनेशिया येथून तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्य करून आलेल्या या व्यक्तीला अहमदनगर शहरातील मुकूंदनगर भागातून ताब्यात घेतल्यानंतर तो कोरोना पॉझीटिव्ह असल्याचे सिध्द झाले. चौकशी दरम्यान संबंधीत व्यक्ती ही १० ते २० मार्च या कालावधीत राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील ३, कोल्हार येथील ७, दाढ येथील ५, पाथरे येथील ४, हसनापूर येथील ७ याप्रमाणे या पाच गावातील २५ जणांच्या संपर्कात आली असल्याचे समोर आले. यावर आरोग्य विभागाने तात्काळ या २५ जणांचा तपास करीत शुक्रवारी या २५ जणांना कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविले.
अवघ्या २६-२७ किलोमीटर अंतरावर असलेल्या संगमनेर येथे कोरोना बाधित रूग्ण असल्याचे समोर आले आहे. आता त्यातच इंडोनेशिया येथून तबलीक जमातीमध्ये दोन दिवस वास्तव्य करून आलेला व्यक्ती कोरोना पॉझीटिव्ह निघाल्याने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोणी बुद्रूक, कोल्हार, दाढ, पाथरे, हसनापूर या पाच गावातील २५ जणांना कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे नेल्याने येथील नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे.
पाच गावांमध्ये तीन लॉकडाऊनचा निर्णय
राहाता तालुक्यातील पाच गावांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून (दि.४ एप्रिल) मेडीकल सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन घेण्याचा निर्णय झाला आहे. किराणा दुकानदार, टपरीचालक, फळ, भाजीपाला विक्रेते मॉलचा यात सहभाग असणार आहे. तर राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेच्या शाखा आणि पतसंस्था यांनीही या लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.