कोरोना साथीचे लोण शहरांतून ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:18 AM2021-05-22T04:18:59+5:302021-05-22T04:18:59+5:30

श्रीरामपूर : जिल्ह्यात प्रारंभी शहरांमध्ये आलेल्या कोरोना प्रादुर्भावाचे लोण आता ग्रामीण भागाकडे सरकल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रुग्णसंख्या दुसऱ्या ...

Corona pandemic spreads from cities to rural areas | कोरोना साथीचे लोण शहरांतून ग्रामीण भागात

कोरोना साथीचे लोण शहरांतून ग्रामीण भागात

श्रीरामपूर : जिल्ह्यात प्रारंभी शहरांमध्ये आलेल्या कोरोना प्रादुर्भावाचे लोण आता ग्रामीण भागाकडे सरकल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेतील उच्चांकाच्या तुलनेत निम्म्यावर घटली आहे. ग्रामीण भागामध्ये मात्र तब्बल तीन पट रुग्ण आढळून येत आहेत.

प्रारंभी नगर शहर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर ही मोठी शहरे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. महापालिका तसेच ब वर्ग नगरपालिका असलेल्या मोठ्या शहरांतून आता व्हायरसने छोट्या शहरात व ग्रामीण भागात शिरकाव केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा, पारनेर या तालुक्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे.

नगर महापालिकेच्या हद्दीपेक्षा नगर तालुक्यात दुप्पट तर संगमनेर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये चक्क दहा पटीने अधिक सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर व कोपरगावमध्ये अशीच स्थिती असून तेथेही शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आलेला आहे.

-----

रुग्णालयातील बेड्स खाली

पंधरा दिवसांपूर्वी शहरातील सर्वच रुग्णालयांत बेड्स फुल होते. विशेषतः ऑक्सिजन बेड्स तर उपलब्ध करणे अशक्यप्राय गोष्ट बनली होती. आता मात्र जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये रुग्णांना सहजासहजी ऑक्सिजन बेड्स मिळत आहेत.

----

मोठ्या शहरातील सक्रिय रुग्ण

नगर महापालिका : ७८७

संगमनेर शहर : २४९

श्रीरामपूर शहर : ३५५

कोपरगाव : शहर व तालुका ७९९

------

ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण

संगमनेर तालुका : २१००

नगर तालुका : १६२२

नेवासा : १४३९

शेवगाव : १३४१

अकोले : १४३४

पाथर्डी : १३७८

पारनेर : १२६९

श्रीगोंदा : १००१

श्रीरामपूर : ९६६

------

ग्रामीण भागात प्रसारामागील कारणे

ग्रामीण भागामध्ये शहरांच्या तुलनेत मास्क, सॅनिटायझर वापराचे प्रमाण अत्यल्प आहे. शहरामध्ये बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी वर्गाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पैशांअभावी रुग्णालयात उपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे लोक नाइलाजाने घरातच उपचार घेत आहेत. त्याच्या परिणामी संपूर्ण कुटुंबे बाधित होत आहेत.

-----

प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चाचण्या

जिल्हा प्रशासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आता संशयित रुग्णांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. यामध्ये रॅपिड चाचणी तसेच आरटीपीसीआर या दोन्हीही चाचण्यांचे प्रमाण सारखे आहे. अनेक गावांमध्ये तर कॅम्प घेऊन चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्ण संख्या अचानक वाढल्याचे दिसते.

-----

संगमनेर शहरात पंधरा दिवसांपूर्वी दररोज दीडशेहून अधिक रुग्ण मिळत होते. परिस्थिती चिंताजनक होती. आता मात्र, दररोज केवळ २० ते २५ रुग्ण मिळून येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात घेतल्या गेलेल्या शंभर चाचण्यांमध्ये केवळ एक किंवा दोन रुग्ण पॉझिटिव्ह मिळत आहेत. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे.

-सचिन बांगर,

मुख्याधिकारी, संगमनेर पालिका

----

Web Title: Corona pandemic spreads from cities to rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.