जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:30+5:302021-03-04T04:36:30+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी तब्बल २२१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचार घेणाऱ्या ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी तब्बल २२१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही १२५० इतकी झाली आहे. एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६६ आणि अँटिजन चाचणीत १९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (७९), अकोले (१२), जामखेड (२), कर्जत (१८), कोपरगाव (६), नगर ग्रामीण (१३), नेवासा (६), पारनेर (५), राहुरी (२), संगमनेर (१५), शेवगाव (१२), श्रीगोंदा (८), श्रीरामपूर (५), कॅन्टोनमेंट (१), पाथर्डी (२), राहाता (२०), राहुरी (२), संगमनेर (७), इतर जिल्हा (२), पाथर्डी (४), राहाता येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ९२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे.
कोरोना स्थिती
----------
बरे झालेली रुग्णसंख्या: ७३,९२४
उपचार सुरू असलेले रुग्ण: १२५०
मृत्यू: ११४७
एकूण रुग्णसंख्या: ७६,३२१
-------------
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोरोनाचा आढावा
जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी दुपारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करणे, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबत त्यांनी यंत्रणेला आदेश दिले. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंडाची कारवाई करणे, शासकीय कार्यालयात आता मास्क नाही तर प्रवेश नाही, याची कार्यवाही केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्याने त्यांच्या क्षेत्रात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासंदर्भातील सर्व तयारी दोन दिवसांत पूर्ण करावी. कोविड केअर सेंटरप्रमाणेच कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित करण्याचेही आदेश दिले.