लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह ही निव्वळ अफवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:29+5:302021-05-31T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याच्या अफवा समोर येत आहेत. त्यामुळे गैरसमजातून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याच्या अफवा समोर येत आहेत. त्यामुळे गैरसमजातून अनेकांनी लसीकरण करून घेण्याकडे पाठ फिरवली. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काहींनी लस घेतली. मात्र, लसीकरणापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोना चाचणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होते ही निव्वळ अफवाच असल्याचे संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘फ्रंटलाइन वॉरियर्स’ म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर काम करणाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील नागरिक व आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी को-विन ॲपवर नोंदणी करीत अनेकांनी लस घेतली आहे. काहींचे दोन्ही डोस पूर्ण झाले, तर अनेकांचा दुसरा डोस बाकी आहे.
लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचे लसीकरण झाले नसून, ते लसीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना मात्र लसीकरण केल्यानंतर अनेक आजार येतात, कोरोना पॉझिटिव्ह होते, अशा अफवा ऐकायला मिळाल्या. त्यामुळे लसीकरण करून घेण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली.
यात काही शिक्षित, तर काही अशिक्षित नागरिकांचा देखील समावेश आहे. शिक्षण आणि जागरूकता या अभावामुळे कुणीतरी काहीतरी सांगितले आणि त्यावर लगेचच अनेकांनी विश्वास ठेवला. त्यातून या अफवा समोर आल्या. कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाची लक्षणे जाणवत असलेल्या काहींनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसून, ते कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह झाले. त्यामुळे गैरसमजातून लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याची अफवा पसरली आहे.
-----------
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह होते, ही निव्वळ अफवाच आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण होते. लस घेतल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह होत नाही. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येकाने लसीकरणासाठी नोंदणी करावी, लस घ्यावी. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे, हाच सर्वांत सुरक्षित उपाय आहे.
डॉ. शशिकांत मंगरूळे, प्रांताधिकारी, संगमनेर उपविभाग
------------------
कोणत्याच प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोणताच आजार होत नाही. लसीकरण हे आजार होऊ नये अथवा आजार झाल्यास त्याचे दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावेत, या करिता केलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. भारतात क्षयरोग, पोलिओ, गोवर, कावीळ ब, स्वाईन फ्लू या आजारांवरील लसी देण्यात येतात. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. ते सुरक्षित आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये.
डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर
----------
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण (२७ मे पर्यंत)
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी २६१११ १७९८८
फ्रंटलाईन वर्कर्स १०१६७ ६१२०
४५ वर्षांपुढील सर्व ४६३४८२ १३५७८५
१८ ते ४४ २०००० -------
-----------------
लसीकरणासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट बंधनकारक
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येते आहे. त्यामुळे लसीकरण करण्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील प्रत्येकाला ही टेस्ट करणे बंधनकारक आहे. तसे संगमनेरचे तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर अमोल निकम यांचे निर्देश आहेत. लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येते आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये व मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते आहे.