प्रवरानगरमध्ये आईसह दहा वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह; सात जणांना केले क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:09 PM2020-06-07T16:09:57+5:302020-06-07T16:10:34+5:30
मुंबई घाटकोपर येथून प्रवरानगर (लोणी खुर्द, ता.राहाता) येथे आपल्या माहेरी आलेली एक ३५ वर्षीय महिला आणि तिचा १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.
लोणी : मुंबई घाटकोपर येथून प्रवरानगर (लोणी खुर्द, ता.राहाता) येथे आपल्या माहेरी आलेली एक ३५ वर्षीय महिला आणि तिचा १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.
यापूर्वी या परिसरात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान या महिलेच्या आणि तिच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या सात जणांना आरोग्य विभागाने रविवारी क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती दाढ बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.श्रीपाद मैड यांनी दिली.
या महिलेचा पती कामानिमित्ताने घाटकोपर येथे स्थायिक झालेला आहे. या महिलेचे सासर हे मूळचे अकोले तालुक्यातील आहे. २४ मे रोजी आपल्या सासू आणि मुलासह संबंधित महिला गावी परतली होती. संगमनेर येथे आल्यावर या ठिकाणाहून या महिलेची सासू अकोले येथे गेली. तर ही महिला आपल्या दहा वर्षीय मुलासह प्रवरानगर (लोणी खुर्द) येथे आपल्या माहेरी आली होती. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित महिलेला आणि तिच्या मुलांला तपासणी करून लोणी खुर्द येथे असलेल्या विलगीकरण कक्षात पाठविले होते.
३ जून रोजी विलगीकरण कक्षातून घरी परतल्यावर ४ जूनला या महिलेल्या आणि तिच्या मुलांला त्रास जाणवू लागल्यामुळे या मायलेकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.