सुप्यात प्रभागनिहाय नागरिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:24+5:302021-05-21T04:21:24+5:30
सुपा : सुप्यातील कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य, महसूल अशी सर्व विभागांनी एकत्र येत प्रत्येक प्रभागनिहाय नागरिकांची ...
सुपा : सुप्यातील कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य, महसूल अशी सर्व विभागांनी एकत्र येत प्रत्येक प्रभागनिहाय नागरिकांची काेरोना तपासणी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी लागणारे किट मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही केली जाणार आहे, असे रूईछत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी अश्विनी गुंजाळ यांनी सांगितले.
सुप्यातून जाणाऱ्या नगर-पुणे महामार्गावरील वाहनांची वर्दळही कमालीची कमी झाली आहे. सुप्यातील लॉकडाऊन काळात निर्बंध काहीसे सैल करताच भाजीपाला, फळे, शेतमाल विक्री सुरू झाली. तशी ग्राहक, विक्रेत्यांची गर्दी वाढली. त्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाणही वाढले. पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनाला येताच कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी नियम कडक करतानाच विनाकारण फिरणारे, बाजारातील ग्राहक, विक्रेते यांची रॅपिड, आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. तसेच बाधितांना तत्काळ उपचारासाठी कोविड सेंटर, विलगीकरण कक्षात पाठविण्यात येत आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुपा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राजवळील प्रभागामध्ये नागरिकांची कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याठिकाणी २५ संशयितांची तपासणी केली असता, त्यात १२ जण काेरोनाबाधित आढळल्याचे डॉ. गुंजाळ यांनी सांगितले.