उद्दिष्टपूर्तीसाठी मयतांच्याही होतायेत कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:33+5:302021-07-01T04:15:33+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मयताचेही नाव कोरोना चाचण्यांच्या यादीमध्ये आढळून आल्याचे उघड झाले आहे. ...
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मयताचेही नाव कोरोना चाचण्यांच्या यादीमध्ये आढळून आल्याचे उघड झाले आहे. कोरोना रुग्ण खरेच कमी झाले की, अनावश्यक चाचण्या करून कोरोना कमी झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
कोरोना चाचण्यांची कागदोपत्री उद्दिष्टपूर्ती चिंता वाढविणारी ठरणार आहे. वरिष्ठ पातळीवरून चाचण्या वाढविण्याचे उद्दिष्ट दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात चाचण्यांची आकडेवारी वाढत चालली आहे. आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील कोरोना चाचण्या झालेल्या रुग्णांच्या यादीवर नजर टाकली असता मयताचेही नाव यादीमध्ये असल्याचे दिसून येते. आठवड्यातील चाचण्यांच्या यादीवर नजर टाकली असता आरोग्य कर्मचारी तसेच त्यांच्या घरातील अन्य सदस्यांच्या चाचण्या केल्याचे दिसून येते. एखादी व्यक्ती चाचणीसाठी गेली असता त्याच्या कुटुंबातील अन्य नावे घेऊन कागदोपत्री उद्दिष्टपूर्ती केल्याचे लक्षात येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट अर्थात रुग्णांची चाचणी करून सकारात्मक आल्यानंतर संपर्कातील इतरांचा शोध घेऊन बाधितांवर उपचार सुरू करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्याची जबाबदारी कोरोना प्रतिबंधक ग्राम समित्यांची आहे. परंतु, या समित्याही कागदोपत्रीच आहेत. कोरोना विरूद्धची ही कागदोपत्री लढाई तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरू शकते. कोरोना चाचण्यांच्या उद्दिष्टाऐवजी योग्य व्यक्तींच्या चाचण्या झाल्या तर कोरोना विरूद्धच्या लढाईला बळ मिळेल.
---
वाड्यावस्त्यांवर घरोघरी कोरोना चाचण्या
श्रीगोंदा तालुक्यात वाड्यावस्त्यांवर घरोघरी जाऊन कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील एकही व्यक्ती सुटणार नाही, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. आढळगाव कार्यक्षेत्रातील प्रकाराची चौकशी करणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी दिली.
---
उद्दिष्ट चाचण्या वाढविण्याचे की कोरोना हद्दपारीचे...
कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला होता, त्यावेळी चाचण्यांसाठीच्या किटचा आणि औषधांचा तुटवडा होता. आता रुग्ण कमी झाल्यावर चाचण्यांच्या किटचा महापूर आणि औषधांचा मुबलक पुरवठा होत आहे. कोरोना निधी खर्च करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तर हा खटाटोप नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.