महाराष्ट्रातही कोरोनाची लस मोफत मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:49+5:302020-12-14T04:33:49+5:30
अहमदनगर : कोरोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस मोफत देणार ...
अहमदनगर : कोरोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला देखील कोरोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.
अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी गांधी मैदान येथील भाजप कार्यालयात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, भाजपचे शहराध्यक्ष भय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सुनील रामदासी, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात २०१९ पूर्वी कधीही वीज जात नव्हती, डीपी जळल्याच्या तक्रारी नव्हत्या, ऑइल संपत नव्हते आणि संपले तरी तात्काळ दिले जात होते. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात नैराश्याचे वातावरण आहे. वीज बिलासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे.
---------
मुश्रिफ यांनी हत्ती पळवून लावण्याचे कौशल्य उपयोगात आणावे
‘नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरला हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे आपल्या जिल्ह्यातील बिबट्याचा प्रश्न सोडवणे अवघड नाही. हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळवून लावण्याचे त्यांचे कौशल्य बिबट्याच्या संदर्भात नगर जिल्ह्यात लावले तर शेतकरी सुख-समाधानाने जगेल’, असा टोलाही शिंदे यांनी पालकमंत्र्यांना लगावला. बिबट्या पकडण्याचा आदेश वन विभागाला देत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागते. जिल्ह्यात बिबट्या आला, ते महाविकास आघाडीचे षडयंत्र असल्याची टिप्पणी करीत राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हशा पिकवला.
-----
शेतकरी कायदे हिताचेच
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. केवळ राजकारण म्हणून त्याला विरोध केला जात आहे. गेल्या ७० वर्षांत शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्याचा शेतमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. कायदा कोणाला संपविण्यासाठी तयार झालेला नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही स्पर्धेत उतरता येणार आहे. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशभर जागृती करीत असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी तिन्ही कृषी कायद्यांची सविस्तर माहिती देऊन ते शेतकरी हिताचे कसे आहेत, याबाबत सविस्तर मांडणी केली.