अनाथ महिलेचा आधार बनलेला कोरोना योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:15 AM2020-12-27T04:15:36+5:302020-12-27T04:15:36+5:30
विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून राहत असलेल्या एका वृद्ध व अनाथ महिलेच्या कोरोनाच्या ...
विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून राहत असलेल्या एका वृद्ध व अनाथ महिलेच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न पाण्यावाचून हाल सुरू होते. तिची ही अवस्था पाहून विसापूर येथील रहिवासी व जनसेवेची आवड असलेले वनविभागातील वनपाल संदीप शिवाजी भोसले यांनी तिला स्वत:च्या घासातील घास देण्यास सुरुवात केली. गेल्या नऊ महिन्यांपासून ते त्या महिलेची भूक भागवत आहेत.
४० वर्षांपूर्वी किसनाबाई भोसले ही महिला अंध पती, एक मुलगा, दोन मुलींसह रेल्वेने विसापूर येथे आले. येथे कधी उघड्यावर तर कधी झोपडी करून राहत होते. तेथेच मजुरी करून त्या उपजीविका करत. पुढे त्यांच्या पतीचे निधन झाले. लहान मुलांना घेऊन त्या विसापूर येथेच रमल्या. काही दिवसांनी काही लोकांनी विसापूर येथील भिक्षेकरीगृहातून मुक्त झालेल्या व तेथे मजुरी करून राहत असलेल्या पन्नालाल मुळे यांच्याबरोबर त्यांचा संसार सुरळीत करून दिला. दहा वर्षांपूर्वी पन्नालाल मुळे यांचेही निधन झाले. मुली व मुलगा मोठा झाल्यावर ते बाहेरगावी गेले. ही वृद्ध महिला विसापूर येथे रस्त्याच्या कडेला टपरीमध्येच राहत आहे. गावात ही महिला कशीबशी उपजीविका करत असे. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दुकाने बंद राहू लागले. कोरोनाच्या भीतीमुळे कोठे फिरून जेवण मागणे शक्य होत नव्हते. त्या महिलेचे हाल लक्षात आल्यानंतर संदीप भोसले यांनी तिला त्यांच्या घरून दररोज जेवण पोहोच करू लागले.
याबाबत संदीप भोसले म्हणाले, याकामी पत्नी पुष्पावती ही देखील मदत करीत आहे. यापुढे ती या ठिकाणी आहे, तोपर्यंत तिला जेवण पुरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.