विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:35+5:302021-04-20T04:22:35+5:30
नेवासा : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदार, ...
नेवासा : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदार, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचा निर्णय झाला असून दोन रुग्णवाहिका उपलब्ध होताच ही कार्यवाही करण्यात येणार असून यामध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोविड सेंटरला दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
करे म्हणाले, तालुका प्रशासनाकडून तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून लॉकडाऊन कडक करण्यासाठी वरील निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यात
नाकाबंदी दरम्यान वाहतूक शाखा व संबंधित विभाग यांच्या स्टाफमार्फत तहसीलदार यांच्याकडून दोन पर्यायी खासगी तत्त्वावरील रुग्णवाहिकांची व्यवस्था होताच विनाकारण रस्त्यावर फिरणारे जे नागरिक आहेत. त्यांना थांबवून त्यांची जागेवरच रॅपिड अँटिजेन चाचणी केली जाणार असून ते पॉझिटिव्ह मिळून आल्यास त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेमधून कोविड केअर सेंटरला पाठविले जाणार आहे. त्यानंतर तशी माहिती फक्त त्यांच्या नातेवाइकांना देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे करे यांनी सांगितले.