केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाची गंभीर स्थिती : बच्चू कडू यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 08:57 PM2021-05-13T20:57:29+5:302021-05-13T20:58:37+5:30
कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
अहमदनगर : कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.
कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवर शेंडी (ता. नगर) येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या निशुल्क प्रहार कोविड सेंटरला बुधवारी मंत्री कडू यांनी भेट देऊन सुरु असलेल्या रुग्णसेवेची पाहणी केली. यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, राज्य प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष देविदास येवले, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे, शिवसेना विभाग समन्वयक धनंजय जाधव, तालुका दूध संघाचे अध्यक्ष उत्तम अमृते, मेजर सुनील परदेशी, श्रीराम शिंदे, दीपाली पाटील आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री कडू म्हणाले की, आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असून, प्रहारचे कोविड सेंटर गोरगरिबांना आधार ठरत आहे. शंभर बेडची सुविधा असलेल्या विनामूल्य प्रहारच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या व संकटकाळात धैर्याने लढा देण्याचे आवाहन केले. शिवाय कोविड सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका व इतर रुग्ण सेवकांचे त्यांनी कौतुक केले.