कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:45+5:302021-06-28T04:15:45+5:30
अहमदनगर : जिल्ह्याने आता कुठेतरी कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर टाकली आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्याने आता कुठेतरी कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र, पुन्हा ‘डेल्टा प्लस’ने चिंतेत भर टाकली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उतरले आहे. सुदैवाने नगर जिल्ह्यात एकही ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण आढळून आला नाही, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. दररोज चार हजार रुग्ण आढळून येत होते. तसेच ४० ते ५० जणांचा मृत्यू होत होता. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे तीन ते चार महिने बाजारपेठ ठप्प होती. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. वेळीच उपाययोजना हाती घेतल्याने कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या चारशे ते पाचशे इतकी आहे. काही तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहेत. नगर शहरातही १० ते १५ एवढेच दैनंदिन रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असताना दुसरीकडे मात्र ‘डेल्टा प्लस’ने नवे संकट निर्माण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नसला तरी आरोग्य विभागाने ‘डेल्टा प्लस’ची धास्ती घेतली आहे. यावरील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.
--------------
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविली
जिल्ह्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली असली तरी कोरोना तपासणी मात्र थांबविण्यात आली नाही. जिल्हाभरात दररोज १० ते १५ हजार जणांची आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणी केली जात आहे. कोरोना तपासणी केलेल्या संशयितांच्या तपासणीचा अहवालही लवकर येत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. रुग्ण आढळल्यास तत्काळ उपचारासाठी दाखल केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत, असे घरीच उपचार घेत आहेत.
------------
धोका अद्याप टळला नाही
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी ‘डेल्टा प्लस’चा धोका कायम आहे. त्यामुळे अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्य विभाग उपाययोजना करण्यासाठी तत्पर असला तरी जोखीमग्रस्त रुग्ण, तरुण वर्ग यांनी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. लग्न, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. मास्क, सॅनिटायझरचा नियमित करणे आवश्यक आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
-----------------
ही घेतली जातेय खबरदारी...........
सकाळी सात ते दुपारी चारपर्यंतच दुकाने सुरू
सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू
लग्न समारंभास ५०, तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी
कोरोना नियमांचे पालन बंधनकारक
शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद
शासकीय व खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती
--------------
डमी आहे.....डमी क्रमांक -८४४