देवदैठणमध्ये कोरोनाची इंट्री; संपर्कातील व्यक्तींची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:10 AM2020-07-19T11:10:29+5:302020-07-19T11:10:53+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रविवारी (१९ जुलै) एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. दरम्यान, या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.
देवदैठण येथील बसस्थानकाशेजारी राहणा-या एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. या महिलेचा पती शिरूर येथील खाजगी दवाखान्यात सफाई कामगार म्हणून कामाला जात होता. काही दिवसांपूर्वी संबंधित दवाखान्यातील डॉक्टर हीे कोरोनाबाधीत आढळले. या महिलेच्या पतीस त्यानंतर ताप येऊ लागला.
देवदैठण येथील आरोग्य सेविकांनी या दोघांना श्रीगोंदा येथील उपचार केंद्रात पाठवले. तेथून त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या पतीचा अहवाल येणे बाकी आहे. घरातील अन्य सदस्यांची तपासणी केली जाणार आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, तहसिलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक अरविंद माने दुपारपर्यंत देवदैठण येथे दाखल होत आहेत. त्यांनी या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आरोग्यसेविका जयश्री सरोदे, सुनीता यादव, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, वसंत बनकर यांनी गावात तातडीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत.