हिवरेबाजारच्या पुढाकारातून २८ हजार गावात कोरोनामुक्त गाव अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:29+5:302021-05-28T04:16:29+5:30

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता ...

Coronation free village campaign in 28,000 villages through Hivrebazar initiative | हिवरेबाजारच्या पुढाकारातून २८ हजार गावात कोरोनामुक्त गाव अभियान

हिवरेबाजारच्या पुढाकारातून २८ हजार गावात कोरोनामुक्त गाव अभियान

अहमदनगर : राज्यातील २८ हजार गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आदर्श गाव हिवरेबाजारच्या (ता. नगर) धर्तीवर कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यासाठी आता गावपातळीवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य व ग्रामविकास मंत्र्यांना गुरुवारी पाठविला आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हिवरेबाजारने कोरोनामुक्त गाव अभियान सुरू करून गाव कोरोनामुक्त केले. त्यासाठी गावात विविध समित्या व त्यांचे कामकाज यांची काटेकोर कार्यवाही सुरू केली. आता याच धर्तीवर राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत जशा स्पर्धा घेण्यात आल्या तशाच प्रकारच्या स्पर्धा कोरोनामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून आता राबविण्यात येणार आहे. या स्पर्धांचा आराखडा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून गावांची यासाठी पूर्वतयारी करून घेण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

---

असा आहे स्पर्धेचा आराखडा

ही स्पर्धा ५o गुणांची असणार आहे. त्यात २१ मुद्दे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार गुणांकन केले जाणार आहे.

गावात कोरोनामुक्तीसाठी मुख्य समिती निश्चित करणे, गावातील सहकारी संस्था व तत्सम संस्थांचा सहभाग घेणे प्रत्येकी ५ गुण, जनजागृतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर, लसीकरण करणे या मुद्यांना प्रत्येकी तीन गुण, विविध पथकांची निर्मिती करणे, सर्व कुटुंबांचा सर्व्हे, ट्रेसिंग करणे, रॅपिड टेस्टची व्यवस्था, संशयितांना विलगीकरणात ठेवणे, बाधितांना उपचारासाठी पाठविणे, त्यासाठी वाहतुकीची व्यवस्था, विलगीकरण कक्षात सर्व साहित्य ठेवणे, गावातील खासगी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे, कुटुंबातील सर्व सदस्य बाधित असतील तर पथकाने सहकार्य करणे, बाधित कुटुंबातील शेतकऱ्यांचे दूध, भाजीपाला स्वयंसेवकांमार्फत योग्य ठिकाणी पोहोचविणे, बाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी समितीने त्यांच्याशी संवाद करणे, कोरोनाविरहित कुटुंबाची विशेष नोंद ठेवणे, लक्षणे असणाऱ्यांना उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था, लहान मुले, गर्भवती मातांचा सर्व्हे, चाकरमान्यांसाठी घेतलेली खबरदारी, मृत्युदर कमी असणे, पथकातील कोणीच बाधित होऊ नये म्हणून नियमांचे पालन या मुद्यांना प्रत्येकी २ गुण असतील.

---

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तरीही सर्व गावे त्याचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असावेत, यासाठी कोरोनामुक्त गाव अभियानाची संकल्पना तयार करण्यात आली. गावांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचा आराखडा गुरुवारी राज्य सरकारला पाठविला आहे.

- पद्मश्री पोपटराव पवार,

हिवरे बाजार

Web Title: Coronation free village campaign in 28,000 villages through Hivrebazar initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.