कोरोनाबाधित कैदी राहुरी विद्यापीठ व कुकडी पाटबंधारे विश्रामगृहात करणार क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:48 PM2020-08-01T12:48:51+5:302020-08-01T12:49:28+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच दुय्यम कारागृहात कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली आहे. श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर येथील कैद्यांना कोरोना झाला आहे. तब्बल ६०च्यापेक्षा अधिक कैदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अशा बाधित कैद्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहेत.
विसापूर कारागृहातील कैद्यांनाही काही प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. येथील कैद्यांना लागण झाल्यास त्यांची व्यवस्था कार्यकारी अभियंता. कुकडी पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहात करण्यात येणार आहे.
याबाबत सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर तर आरोग्य सोयी-सुविधांची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाकडे देण्यात आलेली आहे. जेवण, नाश्ता, चहा आदी सुविधा देण्याबरोबरच तेथील सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.