कोरोनाग्रस्तांना होतोय ‘प्रोनिंग’चा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:23+5:302021-05-06T04:22:23+5:30
संगमनेर : पालथे, पोटावर झोपण्यास वैद्यकीय भाषेत प्रोनिंग असे म्हणतात. प्रोनिंगमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सुधारण्यास मदत होत ...
संगमनेर : पालथे, पोटावर झोपण्यास वैद्यकीय भाषेत प्रोनिंग असे म्हणतात. प्रोनिंगमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी सुधारण्यास मदत होत असल्याचे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी काही काळ पालथे झोपावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे; मात्र हे करत असताना विशेष काळजी घेण्याचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्तांना श्वास घेण्यासाठी असलेल्या सोप्या पद्धतींपैकी प्रोनिंग ही चांगली पद्धत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या महाभयंकर लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी कमी होऊन अनेकांना श्वास घेण्यात अडचण होते. त्यावेळी रुग्णालयांमध्ये व विलगीकरणात असलेल्या रुग्णांना डॉक्टर पालथे, पोटावर झोपण्यासाठी सांगतात. ज्याद्वारे कोरोना रुग्ण स्वतःच स्वतःची प्राणवायूची पातळी योग्य राखू शकतो. ही पद्धत प्रभावी ठरत असून, जवळ-जवळ बहुतांशी डॉक्टर हाच सल्ला देत आहेत, तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर डॉक्टर रुग्णांना घरीच प्रोनिंग करायला सांगत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी ही पद्धत सुचविली आहे. यामुळे रुग्णांची प्राणवायूची पातळी सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
----------
असे करावे ‘प्रोनिंग’
रुग्णाला पोटावर पालथे झोपविणे. त्याच्या मानेखाली उशी ठेवावी. नंतर छाती आणि पोटाखाली उशी ठेवावी. दोन उशी पायाच्या खाली ठेवाव्यात. काही वेळ या स्थितीत पडून राहिल्यास रुग्णाला फायदा होऊ शकतो. अशी प्रक्रिया केल्यास फुफ्फुसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होऊ लागते. फुफ्फुसातील असलेला द्रव व्यवस्थित पसरतो. ज्यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये सहज पोहोचतो. ऑक्सिजनची पातळीदेखील खाली घसरत नाही. असेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
-----------
ज्या व्यक्तीला पोटावर पालथे झोपणे सहज शक्य आहे, त्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास काही हरकत नाही; मात्र ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांना मणक्याचे व हाडांचे विकार आहेत, त्यांनी अस्थिरोग, मणकेविकार तज्ज्ञ अथवा ते उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने हा प्रयोग करावा. मनाने कुठल्याही गोष्टी करू नयेत.
डॉ. प्रमोद राजुस्कर, अस्थिरोग तज्ज्ञ, संगमनेर.
------------
‘प्रोनिंग’चा फायदा चांगला होतो आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी आम्हीदेखील या पद्धतीचा अवलंब केला. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना अनेकांना या पद्धतीचा फायदा झाल्याचे दिसून आले; मात्र ‘प्रोनिंग’ करत असताना ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
डॉ. प्रदीप कुटे, सर्जन, संगमनेर.
----------
गरोदर महिला या कोणत्याही प्रकारच्या श्वसनाशी संबंधित संक्रमणांना अधिक संवेदनक्षम असतात आणि त्यामुळेच फ्ल्यूसारखे आजार इतर व्यक्तींच्या तुलनेत गरोदर महिलांसाठी अधिक घातक ठरू शकतात. म्हणूनच त्यांच्यासाठी श्वासोच्छ्वास व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. गर्भवती महिलांनी पोटावर झोपू नये. डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे आई व बाळ या दोघांची प्राणवायूची पातळी सुरक्षित राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्राणायाम, अनुलोम- विलोम, कपालभाती, दीर्घ श्वासोच्छ्वास हे जास्तीत जास्त केल्यास गर्भवती महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो.
डॉ. श्रद्धा वाणी, संगमनेर.