coronavirus : कोरोनापासून बचावासाठी त्याने सायकलने शेकडो किमी प्रवास करत गाठले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:09 AM2020-03-24T07:09:34+5:302020-03-24T07:10:37+5:30
गर्दीतून जाताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याने सायकल पर्याय निवडला.
- हेमंत आवारी
अहमदनगर - मेस व अभ्यासिका बंद त्यात कोरोनाची वाढती भीती यामुळे त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला, बस मधील गर्दी लक्षात घेऊन कोरोना टाळण्यासाठी त्याने चक्क १८६ किलोमीटर चा सायकल वरून प्रवास करत आपले घर गाठले.
तालुक्यातील गर्दनी येथील अमोल मंडलिक हा मुलगा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कारणासाठी पुण्यातील सांगावी येथे राहतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मेस व अभ्यासिका बंद झाल्या. काळजीपोटी घरातील लोकांनी गावाकडे येण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. पण गावी जायचं तर एसटी आणि खासगी गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
त्यामुळे गर्दीतून जाताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याने सायकल पर्याय निवडला. अभ्यासिक ते हॉस्टेल अस नेहमी कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या अनिलने कोणताही सराव नसताना लांब पल्ल्याचा प्रवास केला आणि गाव गाठले. त्याचे गर्दनी गावातून कौतुक होत आहे.