coronavirus: मंदिरे बंद असल्याने हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट, कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 05:45 AM2020-10-30T05:45:41+5:302020-10-30T07:17:28+5:30
Coronavirus Unlock News : मंदिर बंद असल्याने दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत.
- चंद्रकांत शेळके
अहमदनगर : लॉकडाऊनमध्ये मोठी मंदिरे बंद असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले दुकानदार, त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिर्डी, शिंगणापूर, मढी, मोहटादेवी, ज्ञानेश्वर मंदिर अशा मोठ्या मंदिर संस्थानांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. साईनगरीत लहान-मोठे साडेसातशे लॉजिंग-हॉटेल्स, दोनशे ट्रॅव्हल्स व्यावसायिक, अडीचशे खासगी बसेस, पाचशेवर हार-फुले, लॉकेट व मूर्तींची दुकाने, एक हजाराहून अधिक खासगी जीप-कार वाहतूकदार, शेकडो फूल विक्रेते व फूल उत्पादक शेतकरी मंदिरावरच अवलंबून आहेत.
मंदिरे खुली करा; आरतीला परवानगी द्या!
सोलापूर : महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानापासून सर्व मंदिरे खुली करून कीर्तन, भजन व काकड आरती करण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी द्यावी, अशी मागणी भाविक वारकरी मंडळाने केली आहे़ या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर भजन आंदोलन करण्यात आले. परवानगी मिळाली नाही तर आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर पुढचे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती ह़ भ़ प़ सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली़
शिर्डीत गेल्या पुण्यतिथी उत्सवात ४ कोटी देणगी मिळाली ती यंदा केवळ ३८ लाखांवर आली.
श्रीक्षेत्र मढी ( ता. पाथर्डी ) येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानमध्ये पुजारी, वाहनचालक, आचारी, सुरक्षारक्षक असे मिळून १८ कर्मचारी आहेत. प्रतिमहिना सव्वा कोटींची आर्थिक उलाढाल असलेली ही बाजारपेठ अक्षरश: थंडावली आहे.
राज्यातील इतर तीर्थक्षेत्रातील व्यवसायांची स्थितीही नाजूक झाली आहे. मंदिरेच बंद असल्याने भाविकांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.
शिर्डीत हॉटेल, लॉजिंग व्यवसायात जवळपास पंधरा हजार कोटींची गुंतवणूक आहे. मंदिर बंदमुळे हा व्यवसाय पूर्ण बंद आहे. वीज बिल, कर्जाचे हप्ते, विविध कर, कर्मचाऱ्यांचे पगार अशा बाबी पूर्णत: आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
- अभय शेळके, अध्यक्ष,
हॉटेल असोसिएशन
मंदिर बंद असल्याने दानपेटीचा ओघ जवळजवळ बंदच आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणारी थोडीफार देणगी व बँकातील ठेवींच्या व्याजावरच सध्या संस्थानचा गाडा सुरू आहे.
- कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान