Coronavirus : मुकुंदनगर, आलमगीर, संगमनेर आणि जामखेड शहर हॉटस्पॉट : कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:57 AM2020-04-10T11:57:23+5:302020-04-10T11:59:18+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
अहमदनगर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून २ किमीचा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्री 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश आज जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान, वाहनांची ये -जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हॉटस्पॉट केंद्र जाहीर केलेल्या या प्रतिबंधीत भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरीकांच्या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्थापनांकडून देण्यात आलेल्या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.