मनपाने महावितरणचे १३ कोटींचे वीज बिल थकविले
By | Published: December 5, 2020 04:39 AM2020-12-05T04:39:44+5:302020-12-05T04:39:44+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या तिजोरीत कर रूपाने ४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, महापालिकेने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील ...
अहमदनगर : महापालिकेच्या तिजोरीत कर रूपाने ४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, महापालिकेने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील १३ कोटींचे थकीत बिल भरले नाही. त्यामुळे महावितरणने तगादा सुरू केला असून, मुदतीत बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने महापालिकेला दिला आहे.
महापालिकेने शास्तीमाफी जाहीर केल्याने थकबाकीदारांनी रांगेत उभे राहून कर भरला. ऑक्टोबर महिन्यात मनपाच्या तिजोरीत ४१ कोटी रुपये जमा झाले. हा निधी विकास कामांसाठी राखीव ठेवण्याची मागणी होत असतानाच महावितरणने महापालिकेला थकीत व वीज बिलासाठी नोटीस बजावली आहे. पाणी योजनेवरील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील १५ कोटी ८ लाख ९२ हजार १७६ रुपयांचे वीज बिल आहे. त्यापैकी महापालिकेने ८ कोटी ४ लाख रुपये भरले असून, व्याजासह १३ कोटी ९४ लाख रुपये थकीत आहेत. हे थकीत वीज जमा करून महावितरणला सहकार्य करावे. मुदत पैसे न भरल्यास पाणी योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचाही इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.
महावितरणचे ऑक्टोबरअखेर २०२ कोटी ८० लाख २२ हजार २२३ रुपये मनपाकडे थकीत आहेत. महावितरणे चालू थकीत बीिल व मागील रकमेचा हप्ता, असा प्रस्ताव मनपाला दिला होता; परंतु त्यावरही महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे महापालिकेला ६ कोटी ७२ लाख रुपये व्याज अकारण्यात येत आहे. थकीत वीज बिलापेक्षा व्याजाची रक्कम अधिक असून, मागील थकीत रकमेचे नियोजन करण्यात महापालिकेकडून टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष हाेत असल्याने व्याजाची रक्कम वाढत आहे.
.....
वेळोवळी नोटीस देऊनही मनपाचे दुर्लक्ष
महावितरणने थकीत वीज बिलासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत वेळोवेळी नोटीस बजावली. नोटीस प्राप्त झाल्यानंतर चालू बिल भरून महापालिका वेळ मारून नेत आहे. त्यामुळे मागील थकबाकी व्याजाचा अकडा वाढत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.