मनपाचे लसीकरण केंद्र आता स्वतंत्र इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:05+5:302021-04-13T04:20:05+5:30
अहमदनगर : कोविड चाचणी व लसीकरण केंद्र एकाच इमारतीत असल्याने लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी होत होती. त्यामुळे महापालिकेने सावेडी येथील ...
अहमदनगर : कोविड चाचणी व लसीकरण केंद्र एकाच इमारतीत असल्याने लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी होत होती. त्यामुळे महापालिकेने सावेडी येथील लसीकरण केंद्र प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात, तर माळीवाडा येथील लसीकरण जुन्या महापालिका कार्यालयाच्या आवारात सुरू केले आहे. दरम्यान, लस संपल्याने सोमवारी दिवसभर शहरातील लसीकरण बंद होते. महापालिकेचे शहरात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रात कोविड चाचणीबरोबरच लसीकरणही करण्यात येत होते. त्यामुळे लस घेणारे व चाचणीसाठी येणारे नागरिक एकाच वेळी येत असल्याने गर्दी होत होती. त्यामुळे महापालिकेने लसीकरण केंद्र स्वतंत्र इमारतीत सुरू केले. सावेडी येथील नव्याने सुरू केलेल्या लसीकरण केंद्राची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाहणी केली. नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी वाकळे यांनी केल्या आहेत. महापालिकेने लसीकरणासाठी तयारी केली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर ओढवली आहे.
...
- कोरोनावरील लसीचे डोस संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहेत. लस संपल्यामुळे दिवसभर लसीकरणाचे काम बंद होते. लस प्राप्त झाल्यास मंगळवारी लसीकरण सुरू करण्यात येईल.
- डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
...
सूचना फोटो आहे.
फोटो ओळी: प्रोफेसर चौकातील लसीकरण केंद्राची पाहणी करताना महापौर बाबासाहेब वाकळे.