कोपरगावच्या नगरसेवकाने दिला चक्क उकिरड्यात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:53 PM2017-11-29T17:53:21+5:302017-11-29T17:55:29+5:30
सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी शहरातील गांधीनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरामध्ये येत असल्याने नगरसेवक हाजी महेमूद सय्यद यांनी बुधवारी चक्क उकिरड्यात ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. गांधीनगरसाठी त्यांनी केलेली गांधीगिरी चर्चेचा विषय ठरली.
कोपरगाव : सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी शहरातील गांधीनगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरामध्ये येत असल्याने नगरसेवक हाजी महेमूद सय्यद यांनी बुधवारी चक्क उकिरड्यात ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. गांधीनगरसाठी त्यांनी केलेली गांधीगिरी चर्चेचा विषय ठरली.
प्रभाग क्रमांक ११ च्या गांधीनगरमध्ये झेंडे गल्लीत पालिकेने सार्वजनिक शौचालय बांधले आहे. त्याचे घाण पाणी व अळ्या या परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरांमध्ये येते. प्रचंड दुर्गंधी व डासांच्या उत्पतीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका निवडणुकीची वर्षपूर्ती होऊनही विकास कामांना चालना मिळत नाही. नगरसेवकांच्या पाठपुराव्यास प्रशासन दाद देत नाही. हजारो रूपयांचा कर भरूनही पिण्याचे पाणी मिळत नाही. अस्वच्छता वाढीने सर्वत्र कचरा साचला आहे. गटारींची साफसफाई होत नाही. पायी चालायला धड रस्ते नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाचा निषेध करीत सय्यद यांनी चक्के उकिरड्यात बसून नाश्ता केला. दरम्यान पालिका बांधकाम विभागाचे अभियंता विजय पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.