रस्त्यासाठी नगरसेवकांचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या; सहा महिन्यांपासून रखडले काम
By अरुण वाघमोडे | Published: September 26, 2023 07:10 PM2023-09-26T19:10:55+5:302023-09-26T19:11:06+5:30
यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी सर्व यंत्रनेसह या रस्त्याची पाहणी करून अडचणी सोडवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर : बोल्हेगाव, नागापूर येथील गणेश चौक - केशव कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी सुरू केले मात्र, हे काम अधर्वट असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. हे काम तातडीने मार्गी लावावे, या मागणीसाठी नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात मंगळवारी ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.
या आंदाेलनात नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, नगरसेवक अशोक बडे, राजेश कातोरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, नगरसेवक राजेश कातोरे, डॉ. सागर बोरुडे आदी सहभागी झाले होते. यावेळी अशोक बडे म्हणाले गणेश चौक - केशव कॉर्नर रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने मार्गी न लागल्यास गणेश विसर्जनानंतर महापालिकेत आमरण उपोषण करणा आहोत.
सप्रे म्हणाले रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. हा रस्ता वर्दळीचा असून या ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात, याच रस्त्यावर माझे संपर्क कार्यालय असून तेथेही मला जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे आहे. यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी सर्व यंत्रनेसह या रस्त्याची पाहणी करून अडचणी सोडवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.