"असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर...;" अण्णा हजारे यांची आमदार लंकेंना क्लीन चिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:37 PM2021-08-21T18:37:36+5:302021-08-21T18:41:07+5:30
तहसीलदार ज्योती देवरे यांची एक क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल झाली. यात, त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती.
राळेगणसिद्धी - लोकप्रतिनिधींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आत्महत्येची धमकी देणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत. वेळ पडली, तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन,'' असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
तहसीलदार ज्योती देवरे यांची एक क्लिप शुक्रवारी व्ह्यायरल झाली. यात, त्यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत, आत्महत्येचे विचार मनात येत असल्याची धमकी दिली होती. लंके यांचे थेट नाव घेतले नसले तरी, देवरे यांचा रोख त्यांच्यावरच होता. लंके यांच्यावर आरोप झाल्याने व देवरे यांनी आत्महत्येची धमकी दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांनीही लंके याना लक्ष्य करत टीकेची राळ उठविली होती.
देवरे यांच्या आरोपानंतर दुपारी लंके यांनी यासंदर्भात खुलासा केला. देवरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने त्यांनी व्यथित होऊन, असे बेछूट आरोप केले आहेत. यासंदर्भातील चौकशी अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविल्यानंतर देवरे यांच्यावर कारवाई प्रस्तावित आहे.
देवरे यांच्या आरोपानंतर नीलेश लंके यांनी शनिवारी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. देवरे यांच्याविरोधात जेष्ठ नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर झालेली चौकशी, त्यात तहसीलदार देवरे यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका, त्यातून बाहेर काढण्यासाठी आपणास रात्री, अपरात्री आलेले संदेश, यापूर्वी इतर तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करताना देवरे यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याबाबतचे सर्व अहवाल लंके यांनी हजारे यांना सादर केले.
लंके यांनी सादर केलेल्या अहवालांचे अवलोकन करून हजारे यांनी "असे अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन" असे सांगत हजारे यांनी लंके यांना क्लीन चिट दिली आहे.