म्युकरमायकोसिसवरील खर्च लाखोंच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:17+5:302021-05-24T04:19:17+5:30

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र, योजनेची मर्यादा ...

The cost of mucorrhoea is in the millions | म्युकरमायकोसिसवरील खर्च लाखोंच्या घरात

म्युकरमायकोसिसवरील खर्च लाखोंच्या घरात

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र, योजनेची मर्यादा दीड लाख रुपयांची असून या आजारावरील खर्च साधारण आठ ते दहा लाख रुपयांहून अधिक होतो आहे. त्यामुळे उर्वरित खर्च कसा करणार असा प्रश्न रुग्णांच्या कुटुंबीयांना सतावत आहे. अनेक रुग्णांना तर पैशाअभावी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

मधुमेह, किडनी अथवा कर्करोगाच्या रुग्णांना जर कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यांना म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीजन्य आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. प्रारंभी नगर जिल्ह्यात या आजाराचा प्रत्येक तालुक्यात एखाद दुसरा रुग्ण आढळून येत होता. आता मात्र रुग्ण संख्या वाढली आहे. चिंतेचे कारण असे आहे की अनेकदा रुग्णांना उपचारासाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील महागड्या खासगी रुग्णालयात भरती करावे लागते.

राज्य सरकारने या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. मात्र, योजनेतील दीड लाख रुपयांची मर्यादा उपचाराचा खर्च पाहता तोकडी पडत आहे.

-----

उपचाराचा खर्च लाखात

म्युकरमायकोसिसचा संसर्ग रुग्णाच्या जबड्यात झाला आहे की डोळ्यात तसेच तो मेंदूपर्यंत पसरला गेला आहे का? ही स्थिती पाहूनच खर्चाची मर्यादा निश्चित केली जाते. प्रारंभीच्या अवस्थेत केवळ जबड्यात संसर्ग झालेल्या रुग्णाला एक ते दीड लाख रुपयांमध्ये उपचार मिळू शकतात. मात्र मेंदूमध्ये बाधा संसर्ग पोहोचल्यास खर्च आवाक्याबाहेर जातो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

------

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आजअखेर ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले.

‌------

जिल्हाधिकाऱ्यांकडून इंजेक्शन पुरवठा

म्युकरमायकोसिसवरील अँफोटेरिसीन बी या इंजेक्शनचा पुरवठा आता जिल्हाधिकाऱ्यांकडून नियंत्रित केला जात आहे. राज्यात या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

-----

रुग्णाला जर म्युकरमायकोसिसचा जास्त संसर्ग झालेला नसेल तर दहा दिवस उपचार घ्यावे लागतात. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय स्थिती पाहून हे प्रमाण कमी अधिक होते.

- डॉ. प्रणयकुमार ठाकूर,

सर्जन, श्रीरामपूर.

---

‌माझे चुलते म्युकरमायकोसिसने पीडित आहेत. मात्र, वैद्यकीय उपचारासाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, तो आम्हाला परवडणारा नाही.

- मच्छिंद्र सुपेकर,

तळेगाव दिघे, संगमनेर.

------

Web Title: The cost of mucorrhoea is in the millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.