मुलांचे शैक्षणिक नुकसान पाहू शकत नव्हतो; पोपटराव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 01:59 PM2021-09-27T13:59:00+5:302021-09-27T14:00:13+5:30
कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. परंतु यात मुलांचे अपरिमीत नुकसान होत होते. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला आणि शाळा सुरु केली. आज कोरोनाकाळात शाळा सुरु होऊन १०० दिवस झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. हिवरेबाजारची शाळाही बंद होती. परंतु यात मुलांचे अपरिमीत नुकसान होत होते. हे नुकसान आम्ही पाहू शकत नव्हतो. त्यामुळे हिवरेबाजारचे ग्रामस्थ, पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून निर्णय घेतला आणि शाळा सुरु केली. आज कोरोनाकाळात शाळा सुरु होऊन १०० दिवस झाले आहेत. या निमित्ताने ‘शंभर दिवस शाळेचे’ हा उपक्रम राबविला आहे, असे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेनंतर शाळा सुरू होतील की नाही याची चिंता असतानाच आदर्शगाव हिवरेबाजारने गाव कोरोनामुक्त करून १५ जूनपासून शाळा नियमित सुरू करण्याचे धाडस केले. त्याला सोमवारी (दि.२७) शंभर दिवस झाले आहेत. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पोपटराव पवार बोलत होते. शाळा सुरु असताना कोरोनाबाबत कशी काळजी घेतली, याबाबत पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनीही मत व्यक्त केले. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिल्याचे शिक्षकांनी सांगितले. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत दक्षता घेण्यात येत असल्याचे पालकांनी सांगितले. सर्व दक्षता घेत असल्यामुळे गावात सर्व सुरळीत सुरु आहे. शेजारील गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र, हिवरे बाजारमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, असे सांगत पवार यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.